शेतकरी बंधूनो नमस्कार, वळवाच्या पाऊस सुरु झाला आहे. विविध तज्ज्ञ आणि हवामान विभागाने या वर्षाच्या पावसाचे वाटचालीचे अंदाज वर्तविले जात आहेत. काहीसे आशादायक चित्र यंदाच्या खरीप हंगामाचे सर्वांनीच अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याही मनाने उभारी घेऊन खरिपासाठी पूर्व मशागत करून रान तयार करणे सुरु केले असेलच.
यावर्षी खरीप ज्वारी, मूग या पिकासाठी देखील बाजार सकारात्मक आहे. बाजरी, भुईमूग या पिकांमध्ये फारशी वाढ अथवा घट होईल, अशी परिस्थिती नाही. भरड धान्य पिकांच्या आहारातील महत्त्वाबाबत जागृकता आल्यामुळे नाचणी, वरी, राजगीरा यांची ही मागणी वाढत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा प्रकार, तिची खोली, पाणी धरण्याची क्षमता, सेंद्रिय कर्ब व तिचे आरोग्य विचारात घेऊन पिकाची निवड करावी. पीक निवड केल्यानंतर महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर आपण पीक प्रात्यक्षिकाची साथ घेण्यासाठी अर्ज करावा.
खरीप पीक उत्पादन वाढीसाठी पीक प्रात्याक्षिक, शेतीशाळा, सुधारेल व संकरीत वाणांचे बियाणे वितरण, बिजोत्पादनासाठी बियाणे वितरण, सुक्ष्म मुलद्रव्ये, पीक संरक्षणासाठी किटकनाशके, बीजप्रकिया साहित्य आदी बाबीचे अनुदानावर वितरण कृषी विभाग करत आहे. त्यामुळे आपण आपली वैयक्तिक व गटाचे मागणी नोंदवून पाठपुरावा सुरु केल्यास आपणास वेळेत बियाणे मिळू शकते.
उगवण क्षमता तपासून व बीजप्रकिया करूनच बियाणे पेरावे. जिल्हा परिषद कृषी विभाग, कृषी विस्तार अधिकारी बियाणे उगवण क्षमता तपासणीसाठी गावोगावी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. आपल्याही वाडीवर गावात त्यांना हे प्रात्याक्षिक दाखविण्यासाठी बोलवावे.
बाजारातून बियाणे खरेदी करताना आपण काय काळजी घ्यावी?
- बियाणे खरेदी करताना प्रथम ते सुधारित आहे की संकरीत आहे ते पहावे. सुधारित बियाणे तीन वर्ष वापरता येते. संकरीत बियाणे दरवर्षी नवीन खरेदी करावे लागते. संकरीत बियाण्याचा जोम जास्त असल्यामुळे खत वापर यासाठी त्याचा प्रतिसाद चांगला मिळतो. उत्पादन भरघोस मिळते. सुधारित बियाण्याचे ही उत्पादन जास्त असते. परंतु पाण्याची कमतरता व कमी खत वापरामध्ये हे वाण उत्पादन देतात.
- बियाणे खरेदी करताना परवाना असलेल्या दुकानातून बियाणे खरेदी करावे, बियाण्याची पावती मागून घ्यावी. त्यावर दुकानदाराची व आपली सही केलेली असावे. पावतीवर ज्याची शेती आहे त्याचेच नाव नमूद असावे, खरेदीची दिनांक बियाणे पीक व वाण, बॅच क्रमांक, अंतिम दिनांक व किती बियाणे खरेदी केलेले आहे. या सर्व गोष्टी पावतीवर नमूद असाव्यात, बियाण्यात दोष आढळण्यास बियाणेची पावती व रिकामी पिशवी हा सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो. त्यामुळे रिकामी पिशवी व त्यात १५ ते २० बिया शिल्लक ठेवून जपून ठेवावे.
- बियाणे खरेदी करतानाच बीजप्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करावे, लहान बाळाला जसे जन्मल्यावर ट्रिपलचा डोस देता तसेच बियाण्याला देखील ट्रिपलचा म्हणजेच तीन गोष्टीच्या प्रक्रियेची गरज असते. बुरशीनाशक, कीटकनाशक व जैविक खते या तिघांची बीजप्रक्रिया झाली की कीडरोग याचा उगवणीपासून पुढील महिनाभर किडांचा त्रास होत नाही. साधारण एकरी ४० ते १०० रुपये खर्चात आपण हा बीजप्रक्रिया करु शकतो. त्यामुळे पुढे महिनाभरासाठी व पीक वाढीचा पुढील अवस्था मधील दोन ते तीन हजार रुपये खर्च आपण वाचवू शकतो.
किती लागते बियाणेहेक्टरी बियाणे सर्वसाधारणपणे कोरडवाहू बागायत क्षेत्रातील पिकांच्या पेरणीकरिता बाजरीचे ३ ते ४ किलो, खरीप हंगामाच्या ज्यारी पेरणीसाठी १० ते १२ किलो, मका १५ ते २० किलो, सूर्यफुलासाठी ८ ते १० किलो, तुरी १२ किलो, उडीद, मूग, मटकी, चवळी आदी कडधान्य पिकांचे १५ ते २० किलो, भुईमूग १०० ते १२५ किलो, सोयाबीन ७५ ते ८० किलो बियाणेची आवश्यकता लागते.
बीजप्रक्रिया कशी करावी?प्रात्यक्षिके कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दाखवत आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना यासाठी आपल्या गावात बोलावून बीजप्रक्रिया समजून घ्यावी. चला तर यावर्षी आपण सर्व शेतकरी ठरवू की बियाणे प्रक्रिया झाल्याशिवाय बियाणे पेरणी करावयाची नाही. अत्यंत स्वस्थ खर्चाचे हे तंत्रज्ञान आपण आत्मसात करुन घेवू, बियाणे प्रक्रियेसाठी लागणारी जैविक खते कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग यांचेकडून कमी किमतीत शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतात. तसेच कृषी विभागाच्या महाडीबीटी योजनेतील प्रात्यक्षिकांसाठी देखील ती उपलब्ध आहेत.
मनोजकुमार वेताळ कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली
अधिक वाचा: Soybean Seed शेतकऱ्यांसाठी खुशखबर, यंदा हे सोयाबीनचे बियाणे २५ रुपयांनी स्वस्त