BBF Sowing technique: पारंपरिक पेरणीला बगल देत लातूर तालुक्यातील बोरगाव काळे परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा बीबीएफ व टोकन पद्धतीने सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. यातून कमी खर्चात उत्पादन वाढण्याची हमी असल्याचे सांगण्यात येत आहे. कृषी विभागाकडून याबाबत जनजागृती करण्यात आल्याने यंदा आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.
बोरगाव काळे भागात २ हजार १८९ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी १ हजार ९८० हेक्टरवर खरिपाची पेरणी केली जाते. गतवर्षी १६५० हेक्टरवर पेरणी झाली होती. परिसरातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने खरिपाची पेरणी करत असतात. मात्र यावर्षी कृषी विभागाने जनजागृती केल्याने शेतकऱ्यांत बदल झालेला दिसून येत आहे.
कृषी विभागाने बीबीएफ व टोकण पद्धतीने पेरणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शेतकरी टोकण व बीबीएफ पद्धतीने सोयाबीनच्या पेरणीवर भर देत असल्याचे चित्र आहे. टोकण पेरणीमुळे कमी खर्चात उत्पन्न वाढते त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीची अशा आहे. शेतकरी अशोक काळे म्हणाले, गतवर्षी चांगले उत्पादन मिळाल्याने यंदाही टोकन पद्धतीचा अवलंब केला आहे.
बियाणे कमी, मशागतीच्या खर्चात बचत...
परिसरातील शेतकरी सोयाबीन पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. उत्पादनात वाढ होण्यासाठी पारंपरिक पेरणी सोडून इतर प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ट्रॅक्टर व बैलाच्या साहाय्याने पेरणी केली जात होती. परंतु अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने काही शेतकरी टोकन व बीबीएफ यंत्राच्या साहाय्याने सोयाबीनच्या पेरणीकडे वळले आहे. टोकन पद्धतीमुळे रोगराईचा प्रादुर्भाव होत नाही, बियाणे कमी लागते. खर्चात बचत होते. शिवाय पिकांची उगवण क्षमताही अधिक होऊन कमी कालावधीत पीक जोमात येते. सरी ओढून टोकन केल्याने पाणी साचून राहत नाही परिणामी उत्पादनात वाढ होते.
२० ते ३० टक्के उत्पादन वाढते...
बीबीएफ व टोकणमुळे कीड रोगाचा प्रसार कमी होऊन पिकांना सूर्यप्रकाश प्रमाणात मिळतो. त्यामुळे २० ते ३० टक्के उत्पादनात वाढ होते. पाऊस कमी जास्त झाल्यास पिकाचे नुकसान होत नाही. त्यात आंतरपीक घेता येते, असे कृषी सहायक एम. जी. घुले यांनी सांगितले.