krushi Salla : मराठवाड्यात येत्या चोवीस तासात अवकाळी पावसाचा (unseasonal rains) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन करताना काय काळजी घ्यावी, याविषयीचा कृषी सल्ला (krushi Salla) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जारी केला आहे. वाचा सविस्तर.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात २० मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर २१ मार्च रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात २० मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर २१ मार्च रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात येत्या चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू घट होण्याची शक्यता आहे तर पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवणार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक २० ते २६ मार्चदरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
रब्बी ज्वारी : काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून साठवणूक करावी.
गहू : काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून साठवणूक करावी.
मका : मका पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून घ्यावी.
भुईमूग : उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड १८.८% २ मिली किंवा क्विनॉलफॉस २५% २० मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी : केळी बागेस आवश्यकतेनुसार सरी वरंब्याने पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.
अंबा : आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. आंबा बागेत ००:००:५० १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाडीप बघून फवारणी करावी.
द्राक्ष : काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी. नविन लागवड व पुर्नलागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
फुलशेती
फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावी.
(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : विदर्भासह मराठवाड्यात अवकाळीचा अंदाज वाचा सविस्तर