मला शेतजमीन विकत घ्यायची आहे, परंतु माझ्या नावे ७/१२ नाही. आमच्या आजोबांच्या नावे होता ती शेती त्यांनी त्यांच्या काळात विकली तर मी आता शेतजमीन खरेदी करू शकतो का?
शेतकरी असणाऱ्या कुटुंबालाच शेतजमीन देण्याचा नियम आल्यानंतर अनेकांपुढे शेतजमीन घेण्याचा प्रश्न उभा राहिला. शेती करायची इच्छा असलेल्या अनेकांना केवळ वडिलोपार्जित शेती नसल्यामुळे शेतजमीन खरेदी करण्यास मज्जाव करण्यात आला.
शेतजमिनीवर शेतकऱ्यांचा अधिकार असल्याच्या उद्देशाने हा कायदा अस्तित्वात आला. अनेक शेतकरी कुटुंबांमध्ये आधीच्या पिढ्यांनी शेतजमीन विकल्याचे समोर आले. त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्यामुळे शेतजमीन घेताना मर्यादा आल्या.
वडिलोपार्जित शेतजमीन नसली तरी आपल्या आजोबांच्या शेतीचे वारस तुम्ही होतात आणि त्या काळातला सातबारा आहे, याचा पुरावा सादर करावा लागतो. ती शेती आजोबांनी कधी कोणाला विकली याची तारीख माहीत असेल तर किंवा त्या माणसाकडून त्या विक्री पत्राची एक कॉपी घेतली तर त्यावरून तुम्हाला शेतीचा जुना ७/१२ खाते क्रमांक मिळेल.
त्या नंबरवरून जुना रेकॉर्ड बघून जुन्या काळच्या रेकॉर्डची कॉपी मिळवता येईल. यावरून वंशपरंपरेने शेतकरी आहात हे सिद्ध करता येते. त्यावरून शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकारी यांच्याकडून तयार करून घेणे हा उत्तम पर्याय असतो. या कागदाची पूर्तता झाली तर तुम्हाला शेतजमीन विकत घेता येईल.
याशिवाय काका, चुलत काका, आईचे वडील इत्यादींना सांगून त्यांच्या शेतात हिस्सा घेणे किंवा देत आहे, असे म्हणून नाव घालून घेणे हा एक पर्याय अलीकडे वापरला जातो. असे केले तरी शेतकरी म्हणून नाव लागू शकते. हे तात्पुरते स्वरूपात आणि मग शेती घेऊन झाली की परत हक्कसोड करता येते.
यात नैतिक प्रश्न जरूर येऊ शकेल, पण कायद्याच्या विरोधात काहीही नाही. ज्याला वारस म्हणून शेती मिळते तो आपोआप शेतकरी होतोच. एमएलआरसीच्या कलम ७० अ व ७० ब चा उपयोग करूनही शेतकरी होण्याचा मार्ग खुला होतो.
- प्रगती जाधव-पाटील
उपसंपादक, लोकमत, सातारा
अधिक वाचा: सातबारा उताऱ्यावर चुकीचे नाव लागले असेल तर नावात बदल करता येऊ शकतो का?