भात पिकातील लष्करी अळी ही एक अकस्मात येणारी कीड आहे. काही दिवस सतत पाऊस आणि मध्येच उघडीप व ढगाळ हवामान असे वातावरण या किडीच्या वाढीस अनुकूल असते.
ओळखण्याच्या खुणा- या किडीचा पतंग तपकिरी रंगाचा व मजबूत बांध्याचा असतो.- अळी सुरवातीला हिरवट रंगाची असते व तिच्या दोन्ही बाजूस पांढर पिवळसर पट्टा असतो नंतर ती किंचीत करड्या रंगाची होते.- पूर्ण वाढलेली अळी ३० ते ३७ मि.मी. असते. तर पतंगाच्या विस्तार ३५ ते ४० मि.मी. ऐवढा असतो.
नुकसानीचा प्रकार- या किडीचा उपद्रव हंगामाच्या सुरवातीस बांधावरील गवतावर आढळून येतो. बांधावरील गवत फस्त केल्यानंतर अळ्या मुख्य पिकाकडे वळतात.- दिवसा त्या जमिनीत किंवा चुडामध्ये लपून राहतात व रात्रीच्या वेळी बाहेर येऊन पाने कडेपासून मध्य शिरेपर्यंत खातात.- या किडीचा रोपवाटीकेत प्रादुर्भाव झाल्यास जमिनीलगत रोपे कापून खाल्ली जातात आणि एकही रोप शिल्लक राहत नाही.- रोपवाटीकेत सर्वत्र अळ्यांच्या विष्ठेच्या पांढरट-हिरवट साबुदाण्यासारख्या गोळ्यांचा सडा पडल्याचे दिसून येते.- तसेच चुडामध्येदेखील विष्ठेच्या गोळ्या आढळून येतात यावरूनसुध्दा किडीचे शेतातील अस्तित्व ओळखता येते.- लोंबीत दाणे भरल्यानंतरही या किडीचा उपद्रव होतो. रात्रीच्या वेळी अळ्या लोंब्यांवर चढतात आणि लोंब्या कुरतडून खातात.- अळ्या अतिशय खादाड असल्यामुळे लोंब्यांवर अधाश्यासारख्या तुटून पडतात. दाणे खाण्यापेक्षा लोंब्या कुरतडून टाकून त्या अतोनात नुकसान करतात.- एका शेतातील अन्नसाठा संपल्यानंतर अळ्या हजारोंच्या संख्येने शेजारच्या शेतात जातात.- या किडीच्या अळी एखाद्या लष्करासारखा पिकावर सामुहिक हल्ला करतात व पीक फस्त करतात म्हणून या किडीस लष्करी अळी असे म्हटले जाते.
एकात्मिक व्यवस्थापन१) भाताची कापणी केल्यानंतर ताबडतोब शेताची नांगरट करावी. नांगरटीमुळे किडीचे जमिनीतील सुप्तावस्थेतील कोष उघड्यावर येतात आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्यापैकी काही मरतात तर काही पक्ष्यांच्या भक्षस्थानी पडतात.२) अळीचे स्थलांतर रोखण्यासाठी रोपवाटीकेभोवती किंवा शेताभोवती दोन फुट खोल चर काढून ते पाण्याने भरून ठेवावेत.३) लावणी केलेल्या शेतात पाणी बांधून ठेवावे. त्यामुळे अळ्यांना लपायला जागा राहत नाही आणि अळ्या रोपावरती चढतात व पुढे त्या पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी पडतात.४) बेडकांचे शेतात संवर्धन व संरक्षण करावे कारण बेडूक या किडीच्या अळ्या खातो.५) पिक फुलोऱ्यावर आल्यानंतर ४ ते ५ अळ्या प्रति चौ.मी. आढळल्यास सायंकाळच्या सुमारास वारा शांत असताना क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही २.५ लिटर किंवा लॅब्डा सायहॅलोथ्रीन ५% प्रवाही ५०० मिली किंवा अॅसीफेट ७५ टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी ६०० ग्रॅम/५०० लिटर पाण्यात मिसळून त्याची एक हेक्टर क्षेत्रावर फवारणी करावी.६) पीक तयार झाल्यावर कापणी ताबडतोब करावी.
अधिक वाचा: Soybean Khodmashi : सोयाबीन खोडमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी करा हे सोपे उपाय