Join us

Lasun Lagwad : लसूण लागवड करताय? ह्या आहेत लसणाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या सात जाती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 3:33 PM

लसणाचे स्थानिक अनेक प्रकार आढळतात. त्यात पाकळ्यांचे प्रमाण १६ ते ५० पर्यंत असते. गड्ड्याच्या आकारात व रंग यात विविधता आढळते. रंग बहुधा पांढरा, जांभळा किंवा फिक्कट लाल असतो.

महाराष्ट्रात लसूण लागवडीचे क्षेत्र आणि उत्पन्नाच्या बाबतीत पुणे जिल्ह्याचा अग्रक्रम लागतो. पुणे जिल्ह्याशिवाय बीड, सांगली, अहमदनगर, नाशिक, परभणी, उस्मानाबाद, छ. संभाजीनगर, सोलापूर, लातूर आणि बुलढाणा या जिल्ह्यात लसूण पिकाची लागवड केली जाते.

महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली ६४१० हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ४१,४०० टन एवढे उत्पन्न मिळते. इतर भाजीपाला पिकाच्या तुलनेत लसूण जास्त काळ टिकवून ठेवता येतो. त्यादृष्टीने लसणाची लागवड अत्यंत फायदेशीर आहे. लसणाची निर्यात करून परकिय चलन मिळण्यास उपयुक्त आहे.

सुधारित जातीलसणाचे स्थानिक अनेक प्रकार आढळतात. त्यात पाकळ्यांचे प्रमाण १६ ते ५० पर्यंत असते. गड्ड्याच्या आकारात व रंग यात विविधता आढळते. रंग बहुधा पांढरा, जांभळा किंवा फिक्कट लाल असतो. लसणाच्या जामनगर, नाशिक, महाबळेश्वर, मदुराई, हिस्सार या स्थानिक जाती आहेत.

लसूण या पिकामध्ये सुधारित जाती नाहीत म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे भारतातील आणि महाराष्ट्रातील लसूण लागवड करणाऱ्या निरनिराळ्या भागातून लसणाच्या स्थानिक वाणांचा संग्रह करुन त्यातून निवड पध्दतीने अधिक उत्पन्न देणाऱ्या सुधारित जाती विकसित करण्याचे काम चालू आहे.

यामधून गोदावरी, श्वेता, फुले बसवंत व फुले नीलिमा या जाती प्रसारित करण्यात आल्या आहेत. त्याची महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी विकसीत केलेल्या लसणाच्या सुधारीत जाती१) गोदावरीगड्डा मध्यम आकाराचा असून रंग जांभळा पांढरा, स्वाद तिखट, प्रत्येक गड्ड्यात सुमारे २४ पाकळ्या आणि लागवडीपासून १४० ते १४५ दिवसात तयार होते. हेक्टरी उत्पादन १०० ते १०५ क्विंटल येते. ही जात फुलकिडे, कोळी आणि करपा रोगांना प्रतिकारक आहे.

२) श्वेताया जातीचा गड्डा मोठा, रंग पांढरा शुभ्र, स्वाद तिखट आणि प्रत्येक गड्ड्यात सुमारे २६ पाकळ्या असतात. ही जात लागवडीपासून १३० ते १३५ दिवसात तयार होते आणि हेक्टरी १०० ते १०५ क्विंटल उत्पन्न येते.

३) फुले बसवंतहा लसणाचा सुधारीत वाण निवड पध्दतीने विकसित करण्यात आला आहे. या वाणाच्या गड्ड्याचा रंग जांभळा असून पाकळ्या जांभळ्या रंगाच्या आहेत. सर्वसाधारण एका गड्ड्यात २५ ते ३० पाकळ्या असून सरासरी गड्ड्याचे वजन ३०-३५ ग्रॅम आहे. सरासरी १४० क्विंटल उत्पन्न असून रब्बी हंगामासाठी या वाणांची लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

४) फुले नीलिमाहा लसणाचा सुधारित वाण आहे. या जातीचा गड्डा आकाराने मोठा, आकर्षक, जांभळ्या रंगाचा असून ही जात जांभळा करपा, फुल किडे, कोळी या रोग व किडीस मध्यम प्रतिकारक्षम आहे.

५) यमुना सफेद-१या जातीचे गड्डे पांढऱ्या रंगाचे असून सरासरी उत्पन्न १५० ते १७५ क्विं/हे. मिळते. ही जात भारतात सर्व ठिकाणी लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

६) जी-२८२या जातीचे गड्ढे पांढऱ्या रंगाचे असून मोठ्या आकाराचे आहेत. प्रति गड्ड्यामध्ये १५ ते १६ पाकळ्या असतात. या जातीपासून सरासरी १७५ ते २०० क्विं/हे. उत्पन्न मिळते. तसेच ही जात निर्यातीसाठी उपयुक्त आहे.

७) यमुना सफेद-२या जातीचे गड्डे घट्ट आकर्षक पांढऱ्या रंगाचे असून प्रति गड्ड्यामध्ये ३५ ते ४० पाकळ्या असतात. या जातीचे सरासरी उत्पन्न १५० ते २०० क्विं/हे. मिळते.

अधिक वाचा: Gahu Lagwad : पेरणीच्या कालावधीनुसार कशी कराल गव्हाच्या वाणांची निवड

टॅग्स :पीकलागवड, मशागतपेरणीशेतकरीशेतीभाज्या