Join us

Agriculture News : गोदाम बांधकामासाठी शेतकरी संघांना इतके अनुदान, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 1:26 PM

Agriculture News : याबाबतचे अर्ज 31 जुलैपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावे

गोंदिया : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान भात व कडधान्य सन २०२४-२५ अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबीअंतर्गत गोंदिया जिल्ह्यास Gonidya) कमाल २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामाचे ३ भौतिक लक्ष्यांक प्राप्त आहे. प्रत्यक्ष झालेल्या बांधकामाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार यापैकी जे कमीअसेल ते अनुदान शेतकरी उत्पादक संघ (Farmers Producer Company) किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना देण्यात येणार आहे.

दरम्यान ही बाब बँक कर्जाशी (Bank Loan) निगडित असून, इच्छुक अर्जदाराची निवड झाल्यावर शेतकरी उत्पादक संघ किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना/नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे. बँकेने या प्रकल्पास कर्ज मंजूर केल्यानंतर व मार्गदर्शक सूचनांच्या अधिन राहून बांधकाम केल्यानंतरच संबंधित अर्जदारास अनुदान अनुज्ञेय आहे.

या बाबीसाठी भौतिक लक्ष्यांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात येईल. लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर शेतकरी उत्पादक संघ किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांचे तालुका कृषी अधिकारी यांनी इच्छुक लाभार्थ्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडून अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यताप्राप्त डिझाइन्स, स्पेसिफिकेशन व खर्चाच्या अंदाजपत्रकासह गोदाम बांधकामाच्या प्रस्तावासाठी आवश्यक राहील. याबाबतचे अर्ज ३१ जुलैपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे. 

कोण सहभाग घेऊ शकतात- शेतकरी उत्पादक कंपनी/ शेतकरी उत्पादक संघ 

अनुदान-  कमाल 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु.12.50 लाख अनुदान देय आहे.

निकष -  ही योजना बँक कर्जाशी निगडीत आहे. केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना /नाबार्ड च्या मार्गदर्शक सुचनेनुसार बँके कडे प्रकल्प सादर केल्यानंतर व बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधीत कंपनी सदर बाबीच्या लाभास पात्र राहिल.

अर्ज कुठे करावा - तालुका कृषी अधिकारी कार्यालय

अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा... 

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रगोंदियामार्केट यार्ड