Mango Blossom Management : महाराष्ट्रातील महत्वाच्या फळपिकांपैकी एक फळ म्हणजे आंबा (Mango Farming) होय. आंब्याचे यशस्वी उत्पादनासाठी योग्य व्यवस्थापन असणे आवश्यक असते. यातील एक म्हणजे मोहोर व्यवस्थापन. दरवर्षी हिवाळ्यात डिसेंबर-जानेवारीदरम्यान आंब्याला मोहोर येतो. हाच आंबा मोहोर कीड रोगांपासून वाचविणे (Aamba Mohor) महत्वाचे ठरते. जाणून घेऊया आंबा मोहोर व्यवस्थापनाबद्दल...
आंबा मोहराचे संरक्षण (Mango Blossom Management) करण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी डायक्लोरोव्होस २० मिली, बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी प्रोपीकोनॅझोल १० मिली तसेच कोळी नियंत्रणासाठी डायकोफॉल २० मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पीक संरक्षण
पालवी अवस्थेतील आंब्यावर तुडतुड्यांच्या प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. किडीच्या प्रादुर्भावासाठी कोवळ्या पालवीचे निरीक्षण करावे, प्रादुर्भाव दिसून आल्यास, डेल्टामेथ्रीन (२.८ ईसी) ०.९ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाडावर तसेच खोडावर फवारणी करावी.
बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असलेल्या आंब्यावर तुडतुडे व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि.ली. अधिक हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) ०.५ मि.ली. किंवा विद्राव्य गंधक (८० डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारावे.
पालवी आणि मोहोर अवस्थेतील आंबा बागेमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. आंब्याचा मोहोर करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे करपला असल्यास दुपारी कडक उन्हामध्ये झाडावरील मोहोर झाडून घ्यावा. नियंत्रणासाठी, अॅझॉक्सिस्ट्रोबीन (२३ एससी) ०.६ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी, जि. नाशिक