3G Cutting Method : वेलवर्गीय भाजीपाला पिके (Vegetable Crops) उदा. दुधी भोपळा, दोडका, काकडी, डांगर, कोहळा यांमध्ये त्रीस्तरीय कटिंग पद्धत उपयुक्त (3G Cutting Method) ठरते. पिकाची लागवड झाल्यानंतर त्या पिकाची उंची तीन ते पाच फुटापर्यंत वाढू द्यावी.
सुरुवातीच्या पाच ते सात पानांपर्यंत कोणतीही उपशाखा त्या वेलीवर येऊ देऊ नये. उपशाखा आल्यास त्या ताबडतोब खुडून टाकाव्यात. या आलेल्या उपशाखांवर नर फुलांचे प्रमाण अधिक असते. पाच ते सात पानानंतर येणाऱ्या उपशाखा खुडू नयेत, त्या नैसर्गिकरित्या वाढू द्याव्यात.
वेली पाच ते सात फूट उंचीच्या झाल्यावर त्याच्या मुख्य शाखेचा शेंडा खुडावा. त्यामुळे त्याची सरळ वाढ थांबून त्यावर उपशाखा येण्यास सुरुवात होते. आलेल्या उपशाखांवर १२ ते १५ पाने झाली की त्यांचा पुन्हा शेंडा खुडावा.
त्यावर पुन्हा उपशाखा येतील. या आलेल्या उपशाखांची पुन्हा वाढ करून घ्यावी. या पद्धतीने मुख्य शाखा म्हणजे पहिला स्तर, उपशाखा म्हणजे दूसरा स्तर आणि शेवटी उपशाखांवर आलेल्या शाखा म्हणजे तिसऱ्या स्तराच्या शाखा होय. या क्रमाने वेलींची वाढ करून घ्यावी.
आलेल्या तिसऱ्या स्तराच्या शाखांची वाढ चांगल्यारीतीने होऊ द्यावी. त्यावर मादी फुलांची उत्पत्ती होते. त्यामुळे फळधारणा अधिक होऊन उत्पादनात वाढ होते.
या वेलींवर अधिक फळधारणा होत असल्याने अन्नद्रव्याचे व पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या पिकांत विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी पिकाची विशेष दक्षता घ्यावी लागते.
- ग्रामीण मौसम कृषी सेवा, विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी