Join us

Rabbi Crop Management : रब्बी पिकांचं उत्पादन वाढवायचं, 'ही' पंचसूत्री लक्षात ठेवा!  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:22 AM

Rabbi Crop Management : रब्बी पिकांचे (Rabbi Crop) जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाच पंचसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक असते.

Agriculture News :रब्बी पिकांचे (Rabbi Season) जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत, सुधारित जातींचा वापर, संतुलित खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण या पंचसूत्रीचा अवलंब करावा. याबाबत सविस्तर या लेखातून जाणून घेऊयात.. 

जमिनीची पूर्व/आंतरमशागत शक्य असल्यास पीक लागवडीपूर्वी हिवाळी नांगरट करावी, मात्र जमिनीतील ओल उडून जाणार नाही याची काळजी घ्यावी. नांगरणीनंतर जमीन भुसभुशीत करून घ्यावी कारण अशा जमिनीत बी चांगले रुजून त्याची उगवणही चांगली होते. आंतरमशागतीमध्ये उभ्या पिकात केलेल्या खुरपणी व कोळपणीमुळे तणांचा बंदोबस्त तर होतोच तसेच जमिनीतील भेगा बुजवल्या जाऊन जमिनीची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते. विरळणी करून हेक्‍टरी योग्य रोपांची संख्या ही राखावी.  

सुधारित जातींचा वापर 

जास्त उत्पादन देणाऱ्या, रोग-किडींना कमी बळी पडणाऱ्या सुधारित जातींच्या वापराबरोबरच बियाणाचे शिफारस केलेले हेक्टरी प्रमाण वापरणे गरजेचे असते. शिफारस केलेले पेरणीचे अंतर तसेच पेरणीची योग्य वेळ साधणे अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी महत्त्वाचे असते. 

संतुलित खत व्यवस्थापनपिकांच्या सुधारित जातींना शेणखत, कंपोस्ट खत किंवा जिवाणू खत योग्य मात्रेत दिल्याने रब्बी पिकांचे अपेक्षित उत्पादन मिळविता येते. सहसा युरिया खताचा जास्तीत जास्त वापर केला जातो तसे न करता रब्बी पिकास शिफारस केल्याप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश या खतांची संतुलित मात्रा देणे गरजेचे असते. 

पाणी व्यवस्थापन बागायती पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार, पिकांच्या संवेदनक्षम अवस्थांनुसार विशिष्ट अंतराने तसेच योग्य मात्रेत पाणीपुरवठा करणे गरजेचे असते. फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्था पाणी देण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त दिलेले पाणी पिकास फायदेशीर ठरण्याऐवजी हानिकारक ठरते. 

पीक संरक्षण सगळे सूत्र वापरूनही पिकाचे कीड आणि रोगापासून संरक्षण केले गेले नाही तर पिकाचे उत्पादन जवळपास ४०% घटते म्हणून पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने पिकांवरील कीड व रोगांचा योग्य वेळी, योग्य प्रकारे बंदोबस्त करणे गरजेचे असते. रासायनिक कीड व रोग नाशकांना झालेली प्रतिकारक्षमता लक्षात घेता पिकांसाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा.

- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ

टॅग्स :रब्बीशेती क्षेत्रपीक व्यवस्थापनगहू