Paddy, Ragi Crops : भात, नागली, खुरासणी ही पिके ऐन भरात आहेत, मात्र पावसाच्या संततधार सुरु असल्याने अडचणीत सापडली आहेत. यात भात पोटरी ते निसवण्याच्या अवस्थेत असून नागली, खुरासणीचे पीक चांगलेच बहरले आहे. अशा स्थितीत या तीनही पिकांच्या संरक्षणासाठी काय काळजी घ्यावी, हे या लेखातून पाहणार आहोत.
भात पिकासाठी भात सदृश्य तणाची भेसळ फुलोऱ्यावर येताच लगेच काढावी. जेणेकरून त्याचे दाणे खडून इतर स्वच्छ भात प्रक्षेत्रावर होणारा प्रसार थांबवता येईल. जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज लक्षात घेता सल्ला देण्यात येतो कि भात पिकातील जास्तीचे पाणी काढून टाकावे व पाण्याची पातळी ५ ते १० सेमी पर्यंत ठेवावी.
पाणी व्यवस्थापन : भात पिकाच्या योग्य वाढीकरिता व अधिक उत्पादनाकरीता भात खाचरात पाण्याची योग्य पातळी राखणे आवश्यक आहे. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खाचरातील पाण्याची पातळी पुढीलप्रमाणे असावी. खाचरात रोपांच्या पोटरी अवस्थतेत पाण्याची पातळी १० सेमी असावी.
नागली पिकासाठी.... करपा रोग : प्रादुर्भाव दिसून येताच कार्बनडेन्झीम (बावीस्टीन) @ ०.१ टक्के क्रियाशील घटकाप्रमाणे पाण्यात मिसळून फवारणी करावी.(सोसाट्याचा वारा व पावसाचा अंदाज घेवुनच पिकावर कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणी करावी.)
खुरासणी पिकासाठी.... खुरासणी पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी, खुरासणी पिकात कीटक परागीभवन घडवण्याकरिता एक मधमाश्यांचे कृत्रिम पोळे प्रति एकरसाठी वापरण्याचे शिफारस करण्यात आली आहे. खुरासणी पिकात पाने खाणारी अळी आढळून आल्यास क्लोरोपायरीफॉस 2 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (सोसाट्याचा वारा व पावसाचा अंदाज घेवुनच पिकावर कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणी करावी.)
संकलन : ग्रामिण कृषि मौसम सेवा, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक.