Join us

Agriculture Scheme : ट्रॅक्टर, रोटॅव्हेटर, कडबाकुट्टी यंत्र व विद्युत पंपसच अनुदानावर, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 3:30 PM

Agriculture Scheme : लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड केली जाणार असून 30 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत.

नाशिक : जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत 2024-25 या वर्षासाठी 50 टक्के किंवा मर्यादित अनुदानावर ट्रॅक्टर, रोटॅव्हेटर, कडबाकुट्टी यंत्र व विद्युत पंपसच या साहित्याचा लाभ देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड केली जाणार असून शेतकऱ्यांनी 30 ऑगस्ट 2024 पर्यंत तालुकानिहाय पंचाय समिती येथे आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद नाशिक कृषि विकास अधिकारी (Nashik ZP)  माधुरी गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

योजनेचे बाबनिहाय निकष१. ट्रॅक्टर - सदरची योजना ०८-७० पी. टी. ओ. एच. पी. पर्यंत सर्व ट्रॅक्टरसाठी लागू असेल. ट्रॅक्टर हे BIS/ISI केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या संस्थ व्दारे प्रमाणित असावे. ट्रॅक्टरच्या उत्पादकाचा टेस्ट रिपोर्ट सादर करणे आवश्यक राहील. महत्तम अनुदानाची मर्यादा अनु.जाती, अनु. जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला लाभार्थीना खरेदी किमतीच्या ५०% किंवारुपये १.२५ लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर लाभार्थीना किमतीच्या ४०% किंवा रुपये २.०० लाख यापैकी कमी असेलते प्रति नग देय राहील.

२. रोटॅव्हेटर- ट्रॅक्टर (२० बी. एच. पी. पेक्षा जास्त) चलित औजारे ही BIS / ISI केंद्र शासनाने ठरवुन दिलेल्या संस्थेदारे प्रमाणित असावे. महत्तम अनुदानाची मर्यादा खरेदी किमतीच्या ५०% किंवा जास्तीत जास्त मर्यादीत अनुदान रुपये २८ हजार प्रती नग देय राहील.

३. कडबाकुट्टी यंत्र- (इंजिन / इलेक्ट्रीक मोटार चलीत ३ एच.पी पर्यंत व पॉवरटीलर आणि ट्रॅक्टरचलीत २० बी. एच.पी.पेक्षा कमी) BIS/ISI केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या संस्था व्दारे प्रमाणित असावे. महत्तम अनुदानाची मर्यादा खरेदी किमतीच्या ५०% किंवा जास्तीत जास्त मर्यादीत अनुदान रुपये १६ हजार प्रती नग देय राहील.

४. विदयुत पंपसंच (जलपरी)- ५HP- BIS / ISI केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या संस्था व्दारे प्रमाणित असावे. महत्तम अनुदानाची मर्यादा खरेदी किमतीच्या ५०% किंवा जास्तीत जास्त मर्यादीत अनुदान रुपये ८ हजार प्रती नग देय राहील. 

आवश्यक कागदपत्रेविहीत नमुन्यातील अर्जासोबत स्वतःचे नांवे असलेले ७/१२ व ८ अ चे अद्यावत उतारा सादरकरणे आवश्यक राहिल. यापूर्वी लाभार्थ्याकडे ट्रॅक्टर नसलेबाबतचा दाखला असावा तसेच या किंवा इतर योजनेतून ट्रॅक्टर या घटकाकरीता लाभ घेतला नसल्याबाबतचा दाखला आवश्यक आहे. खरेदी करावयाचे ट्रॅक्टरचे कोटेशन  अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. कडबाकुट्टी यंत्रासाठी ५ जनावरे असल्याचा पशु वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला, विदयुत पंपसंचा साठी पाण्याचा स्त्रोत व विदयुत जोडणी असणे आवश्यक आहे. रोटॅव्हेटर खरेदीनंतर रोटॅव्हेटरचा वापर करण्यासाठी ट्रॅक्टर असलेबाबतचा पुरावा म्हणुन आर. सी. बुक जोडणे आवश्यक आहे.

टॅग्स :कृषी योजनाशेती क्षेत्रनाशिक जिल्हा परिषदनाशिकशेती