Amba Kalam : आंब्याची लागवड (Amba Lagvad) करण्यासाठी कलमे लावली जातात. आंब्यावर विविध प्रकारची कलमे करता येतात, जसे की व्हिप ग्राफ्ट, क्लेफ्ट किंवा वेज ग्राफ्ट इत्यादी. त्यातील आंबा मृदूकाष्ठ कलम आणि कोपाइस कलम या पद्धतीचा अधिक वापर केला जातो. या दोन पद्धतीबद्दल सविस्तर जाणून घेऊयात....
मृदुकाष्ठ कलम
- आंबा शेंडा कलम म्हणजे मृदुकाष्ठ कलम, हे आंब्याच्या झाडाचा प्रसार करण्यासाठी वापरले जाते.
- आंब्याच्या झाडाची कलम करण्यासाठी कोय कलम आणि मृदुकाष्ठ कलम या पद्धतींचा प्रामुख्याने वापर केला जातो.
- कोरड्या आणि उष्ण हवामानामध्ये तेथे लावलेल्या कलमांची मोठ्या प्रमाणावर मर होते, अशा ठिकाणी या पद्धतीने कलमे करावीत.
- या पद्धतीत खुंट म्हणून वापरले जाणारे रोप उंच वाढलेले आणि ३ महिने वयाचे असावे.
- या रोपावर येणाऱ्या नवीन शेंड्यावरील कोवळ्या फुटीवर कलम करावे.
- कलमे करण्यासाठी आंब्यामध्ये फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ योग्य आहे.
- या पद्धतीत सुमारे ८५ टक्के यश मिळते.
कोपाइस कलम
बियांपासून केलेल्या आंब्याच्या जुन्या, कमी उत्पादन देणाऱ्या आणि कमी गुणवत्तेच्या झाडाचे चांगल्या, जातिवंत आणि जास्त उत्पादन देणाऱ्या झाडांमध्ये रूपांतर करण्यासाठी ही कलम पद्धत वापरावी.
- या पद्धतीत १५ वर्षे वयापर्यंतची झाडे जमिनीपासून सुमारे ७५ सें.मी. ते १ मीटर उंचीचे खोड ठेवून करवतीने छाटून टाकावी.
- डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत झाडांची छाटणी करावी.
- छाटलेल्या खोडापासून २५ ते ३० नवीन फुटवे येतात, त्यापैकी खोडाच्या वरील ३० ते ४५ सें.मी. भागातून निघणारे चार ते पाच जोमदार निरोगी फुटवे निवडून त्यावर मृदुकाष्ठ पद्धतीने फेब्रुवारी ते एप्रिल या हंगामात कलम बांधावे.
- छाटलेल्या खोडाला खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे आणि रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बोडों पेस्टचा दरवर्षी जून-जुलैमध्ये लेप द्यावा.
- उन्हामध्ये संपूर्ण उघड्या पडलेल्या खोडांना सावली करावी.
- कलमांच्या फुटीला आधार द्यावा. किडी आणि वाऱ्यापासून संरक्षण करावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी