Grape Crop Management : मागील दोन-तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह (Nashik) महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पाऊस (Cloudy Weather) बरसत आहे. त्यामुळे द्राक्ष पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या स्थितीत द्राक्ष बागेवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची चिन्हे आहेत. भुरीचा प्रादुर्भाव (Bhuri Disease) झाल्यानंतर उत्पादनात घट होते. भुरीच्या परिणामकारक नियंत्रणासाठी पुढील उपाययोजना करता येतील...
द्राक्षावरील भुरी रोगाचे नियंत्रण
- फळछाटणीनंतर ६० दिवसांपूर्वीची स्थिती असलेल्या बागेत ट्रायझोल वर्गातील हेक्झाकोनॅझोल (५ एससी) १ मि.ली किंवा डायफेनोकोनॅझोल ०.७ मि.ली किंवा पॉलिऑक्सिन डी झिंक सॉल्ट (५ एससी) ०.६ मि.ली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घेता येईल.
- ६०-९० दिवसांच्या कालावधीतील बागेमध्ये, सल्फर २ ग्रॅम अधिक कॅल्शिअम क्लोराईड १.२ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- मण्यात पाणी उतरल्यानंतरच्या अवस्थेतील बागेत सल्फर २ ग्रॅम अधिक कॅल्शिअम नायट्रेट १.२ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- अॅपिलोमायसेस किसक्कॅलिस हे जैविक बुरशीनाशक भुरीविरुद्ध प्रभावी काम करते. त्यामुळे याचा नियमितपणे वापर चालू ठेवावा.
- फळधारणेनंतर भुरीचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आल्यास, मेट्राफेनोन (५० एससी) ०.२५ मि.ली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
(फवारणीपूर्वी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे /कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत यांच्या शिफारशीत माहितीनुसार काढणीपूर्व कालावधी अंतर पडताळून पाहणे अत्यंत आवश्यक आहे.)
- ग्रामीण मौसम कृषी सेवा आणि केंद्र इगतपुरी