Agriculture News : विदर्भातील (Vidarbha) अनेक भागात मोसंबी व संत्रा फळ पिकांवर कोळी कीडीचा (Rust Mite) प्रादुर्भाव आढळून आला आहे. कोळी ही कीड अष्टपाद वर्गातील असून, आकाराने सूक्ष्म असते. साध्या डोळ्याने दिसणे कठीण जाते. पानांच्या शिराजवळ किंवा बरेचदा फळांच्या सालीवर बारीक खळग्यात ती अंडी घालते. प्रौढ लांबट, पिवळे असून, पिल्ले फिक्कट पिवळसर असतात. पिल्ले व प्रौढ कोळी आकाराचा फरक सोडल्यास सारखेच दिसतात. सध्या विदर्भातील काही जिल्ह्यात प्रामुख्याने रस्ट माईट व ग्रीन माईट (Green Mite) या कोळी प्रजातींचा उद्रेक आढळून आला आहे.
रस्ट माईट
प्रादुर्भावाची लक्षणे
कीड पाने व फळांचा पृष्ठभाग खरवडतात व त्यातून येणारा रस शोषून घेतात, त्यामुळे पानांवर आणि फळांवर करडे ठिपके आढळून येतात. प्रादुर्भाव वाढल्यास फळांवर तपकीरी लालसर रंगाचे चट्टे पडतात. या अवस्थेला शेतकरी "लाल्या" म्हणुन ओळखतात. कोळीचा प्रादुर्भाव वर्षभर असला तरी फळ धारणेपासून ते फळ काढणीपर्यंत आणि ऑगस्ट ते ऑक्टोंबर दरम्यान जास्त असतो.
या कीडीमुळे फळांचे नुकसान होऊन अनियमीत आकाराची फळे तयार होतात. प्रादुर्भाव ग्रसीत फळांचा रंग बदलतो व प्रत खालावते. त्यामुळे बाजारात कमी भाव मिळतो. विदर्भातील अनेक भागात मोसंबी व संत्रा फळ पिकांवर कोळी कीडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कोळी ही अष्टपदी वर्गातील महत्वाची कीड आहे. सध्या विदर्भातील काही जिल्ह्यात प्रामुख्याने रस्ट माईट व ग्रीन माईट या कोळी प्रजातींचा उद्रेक आढळून आला आहे.
व्यवस्थापन :
प्रतिबंधात्मक उपाय :उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण दिलेल्या झाडांना योग्य प्रमाणात पाणी मिळत आहे याची खात्री करून घ्यावी. पाण्याचा ताण पडल्यास कोळीचा प्रादुर्भाव वाढतो.
सेंद्रीय उपाय :
अझेंडीरॅक्टीन (१%) २ मि.ली. किंवा अझेंडीरॅक्टीन (५%) ०.५ मि.ली. प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळुन फळधारणेच्या वेळी फवारणी केल्यास ही कीड. नियंत्रणात ठेवता येते. १५ दिवसांच्या अंतराने पेट्रोलियम स्प्रे ऑईल (हॉर्टीकल्चर मिनरल ऑईल) २% प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन दोनदा फवारणी करावी.
रासायनिक उपाय :
कोळीचा प्रादुर्भाव दिसताच डायकोफॉल (१८५ ई सी) २ मिली किंवा डायफेनथीयुरॉन (५० डब्लुपी) २ ग्रॅम प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून फळधारणेच्या वेळी १५ दिवसांच्या अंतराने फवारणी केल्यास ही कीड नियंत्रणात ठेवता येते.
संकलन : आय. सी. ए. आर. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्थान, नागपूर