सध्या उष्णतेची लाट आली असल्याने शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. फळबागा संरक्षित करण्यासाठी तसेच पाणीबचतीसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ डॉ. कल्याण देवळाणकर यांनी काही उपाययोजना सुचवल्या आहेत.
जमिनीतील उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकण्यासाठी आच्छादनाचा उपयोग केला जातो. गव्हाचा भुसा, साळीचे तणीस, ज्वारीचा टाकाऊ कडबा, उसाचे पाचट किंवा कोणत्याही पिकाचे टाकाऊ काड, झाडाचा पाला पाचोळा या सर्व वस्तूंचा वापर आच्छादनासाठी करता येतो. पॉलिथिन पेपर किंवा प्लास्टिक, काही रासायनिक द्रव्ये, लहान मोठे दगड किंवा माती सुद्धा आच्छादनासाठी वापरता येते.
फळझाडांमध्ये आच्छादन टाकल्याने बुंध्याजवळची जमीन झाकली जाते. जमिनीला वातावरणातील उष्णता मिळण्यास अडथळा होतो आणि यामुळे बाष्पीभवन बहुतांशी कमी होते. आच्छादनाने जमिनीचा जेवढा जास्तीत जास्त भाग झाकला जाईल, तेवढ्या जास्त प्रमाणात पाण्याची बचत होते. उन्हाळी हंगामात फळझाडांची पाण्याची गरज प्रतिदिवशी प्रत्येक झाडांसाठी ३० लिटर पर्यंत वाढते. यापैकी बरेचसे पाणी बाष्पीभवनामुळे जमिनीतून हवेत शोषले जाते. आच्छादनाचा वापर करून उन्हाळी हंगामात पाण्याची कार्यक्षमता वाढविता येते तसेच पाण्याचा बाष्पीभवनाद्वारे होणारा अपव्यय कमी होतो. आच्छादन पांढऱ्या रंगाचे असेल तर तापमान कमी होते व पाण्याची बचत वाढते.
आच्छादन काळया रंगाचे असेल तर तापमान ५ ते ८ अंश सेल्सिअसने वाढते. प्लास्टिक किंवा पॉलिथिन पेपर वापरल्यासही तापमान वाढते. आच्छादन कमी प्रमाणात टाकल्यास बाष्पीभवनास कमी प्रमाणात आळा बसतो मात्र आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात आच्छादन घातल्यास फळझाडांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रत्येक झाडाच्या बुंध्याभोवती २ ते ५ सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा तसेच फळझाडांमधील अंतरानुसार एकरी ५ ते ७ टन आच्छादनाचा वापर करावा. शक्यतो आच्छादनसाठी उसाच्या पाचटाचा वापर करावा. हेच पाचट पुढील हंगामात जमीन नांगरणीबरोबर गाडल्यास त्याचे खत म्हणून चांगला फायदा होतो.
लेखक : डॉ. कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .