नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता हलका ते मध्यम पावसासोबत हवामान दमट राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २७-२९ डिग्री से. व किमान तापमान २२-२३ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच वा-याचा वेग २०-२६ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला
जोरदार पावसामुळे भाजीपाला पिकांच्या बुंध्याजवळची माती वाहून गेली असल्यास, रोपांना मातीची भर द्यावी. वेगवान वाऱ्यांपासून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वेलींना आधार द्यावा. ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये केवडा (डाऊनी मिल्ड्यू) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये पाने खाणारी अळी, तांबडे भुंगे, तुडतुडे, मावा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. गरजेनुसार पुढील फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी. खरीप कांदा पिकाचे लागवडीसाठी रानबांधणी करावी. रांगडा कांदा लागवडीसाठी बियाण्याची पेरणी करावी.
द्राक्ष पिकासाठी सल्ला
आगाप छाटणीच्या बागेतील नियोजन फळछाटणीपूर्वी माती व पाणी परीक्षण अवश्य करून घ्यावे. त्यानुसार खतांचे व्यवस्थापन करून उत्पादन खर्चात बचत साधता येईल. बऱ्याच जमिनींत चुनखडी व उपलब्ध पाण्यात क्षार ही समस्या दिसून येते. जमिनीत चुनखडी व पाण्यात क्षार असलेल्या बागेत सल्फरचा वापर शेणखतामध्ये मिसळून करता येईल. तर फक्त पाण्यात क्षार असलेल्या परिस्थितीमध्ये जिप्सम १५०-२०० किलो प्रतिएकर प्रमाणे शेणखतात मिसळून देता येईल.
यावेळी चारी घेता आल्यास वेलीची मुळे दहा टक्क्यांपेक्षा अधिक तुटणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. जमिनीमध्ये एस.एस.पी. १०० किलो प्रतिएकर १० टन शेणखतात व्यवस्थित मिसळून घ्यावे. त्याचप्रमाणे नवीन फुटींसाठी नत्राची उपलब्धता करण्याकरिता अमोनिअम सल्फेट ६०-८० किलो प्रतिएकर प्रमाणे साधारण परिस्थितीत बागेत वापरता येईल. शेणखतातून किंवा पाण्यातही नत्र उपलब्ध असल्यामुळे वेलीच्या वाढीचा जोम जास्त प्रमाणात दिसू शकतो. तेव्हा बागेतील परिस्थिती पाहून नत्र कमी-अधिक करावे.
कांदा पिकासाठी सल्ला
खरीप कांद्याची ७ ते ८ आठवड्याची रोपे लागवडीस वापरावी. लागवडीचे वेळी खत मात्रेपैकी निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीचे वेळेस द्यावे. लागवडीचे वेळेस कांदा रोपांची मुळे कीडनाशक, बुरशीनाशक व जीवाणू खतांच्या द्रावणात बुडवावे, हंगामानुसार एखाद्या भागात लागवड एकाच आठवड्यात पूर्ण करावी दोन हंगामांमध्ये अधिक काळ अंतर राखून रोग, किडींचा जीवनक्रम तोडता येईल. फवारणी करताना द्रावणात चिकट द्रव्याचा ०.६ मि.ली. प्रति लिटर पाणी याप्रमाणे वापर करावा. कीडनाशके शिफारशीनुसार आलटून पालटून वापरावीत. एकच कीडनाशक सारखे वापरल्यास किडींची प्रतिकारशक्ती वाढते. (पावसाचा अंदाज घेऊनच फवारणीचे कामे करावीत)
टोमॅटो खत व्यवस्थापन
टोमॅटोमध्ये नत्राची उर्वरित अर्धी मात्रा (६० किलो नत्र १३० किलो युरिया) चार समान हप्त्यांत विभागून (प्रत्येकी ३२ किलो युरिया) पुनर्लागवडीनंतर १५ २५ ४० व ५५ दिवसांनी बांगडी पद्धतीने झाडाच्याबुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळाच्या क्षेत्रात द्यावी. वरखते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. टोमॅटोमध्ये मध्यम प्रकारच्या जमिनीत संकरीत वाणांसाठी प्रति एकरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश देण्याची शिफारस असूनः यापैकी निम्मे नत्र (६० किलो नत्र १३० किलो युरिया), संपूर्ण स्फुरद (६० किलो स्फुरद ३७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट), संपूर्ण पालाश (६० किलो पालाश - १०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) यासोबतच ८० किलो निंबोळी पेंड पुनर्लागवडीच्या वेळी देणे आवश्यक असते.
संकलन : विभागीय संशोधन केंद्र, ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र इगतपुरी