Crop Management : ठराविक अंतराने पाणी देत असताना दोन पाण्याच्या पाळयात अंतर पडल्यास पिकांना पाण्याचा ताण बसतो आणि पाण्याच्या शोधार्थ मुळे आणखी खोल व दूरवर पसरतात. अशा परिस्थितीत मोठ्या क्षेत्रावर पसरलेली मुळेसंस्था असलेली फळझाडे ठिबक सिंचनाखाली आणताना तोट्या अथवा सूक्ष्मनळयाऐवजी सूक्ष्मतुषारचा वापर करणे किफायतशीर ठरते.
फळझाडांना सुरुवातीपासूनच जर ठिबक सिंचन पद्धत बसवली असेल तर पुढे पाण्याचे नियोजन करताना विशेष अडचण येत नाही. पण फळबागेस सुरुवातीस प्रवाही पद्धतीने पाणी दिले असेल आणि नंतर उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे अशा बागा ठिबक सिंचन पद्धतीवर आणावयाच्या असतील तर काही बाबी लक्षात घेणे गरजेचे असते. फळझाडांना लागवडीपासून प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी दिले असल्याने फळझाडाचे संपूर्ण क्षेत्र भिजवले जाते आणि त्यामुळे त्यांची मुळे जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीत खोल, सर्वदूर, लांबपर्यंत पसरलेली असतात.
जर समजा, डाळिंबाच्या झाडासाठी प्रत्येकी एक सूक्ष्मतुषार पुरेसे होते. तर द्राक्षाच्या जुन्या बागेसाठी दोन झाडांच्या ओळींना एक उपनळी टाकून दोन्ही ओळीतील लगतच्या चार झाडांना एक सूक्ष्मतुषार लावावे लागेल. सूक्ष्मतुषार सिंचनाने मुळांचे ठराविक क्षेत्रच ओले होत असल्याने जुन्या फळझाडाला अधूनमधून पाण्याचा ताण बसण्याची शक्यता असते.
यासाठी जमिनीवर झाडांच्या पानांचा व फांद्यांचा जेवढा पसारा असेल तेवढ्याच क्षेत्रावर वाफा तयार करून पहिल्या वर्षी अधूनमधून पाट पाणी द्यावे म्हणजे झाडाला ताण बसणार नाही. त्यानंतर दोन झाडातील मोकळ्या जागेत आडवी व उभी खोल नांगरट केल्याने मुळांची छाटणी होऊन पुन्हा नवीन पांढरी मुळे तयार होतात. त्याचा उपयोग झाडाच्या वाढीसाठी होतो. अशातऱ्हेने मुळाचे क्षेत्र कमी ठेवणे शक्य होते आणि त्यामुळे एका वर्षानंतर जुन्या फळबागा संपूर्णतः ठिबक पद्धती खाली आणता येतात.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .