Maize Crop : मका पिकाच्या पेरणीनंतर सुरुवातीच्या २० दिवसांपर्यंत शेतात पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. मका पिकाची पाने रुंद व लांब असल्यामुळे बाष्पीभवन क्रियेद्वारे पानातून अधिक पाणी बाहेर टाकले जाते. परिणामी मका पिकास पाण्याची गरज जास्त असते. मका पीक पाण्याचा ताणास संपूर्ण पीक कालावधीत संवेदनशील आहे.
म्हणून खरीप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण पडल्यास, पिकाच्या महत्वाच्या अवस्थेच्या काळात संरक्षित पाणी द्यावे. पिकाच्या महत्वाच्या अवस्था पेरणीपासूनचा काळः रोप अवस्था (२५ ते ३० दिवस), तुरा बाहेर पडताना (४५ ते ५० दिवस), फुलोऱ्यात असताना (६० ते ६५ दिवस), दाणे भरण्याच्या वेळी (७५ ते ८० दिवस)
लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रण
भौतिक नियंत्रण
शक्य असल्यास अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत. एकरी १५ कामगंध सापळ्यांचा वापर करावा. किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पोंग्यामध्ये वाळू टाकावी. असे केल्याने अळीला वाढीच्या भागातील खाण्यापासून परावृत्त करता येईल, शेंडा तुटणार नाही. पिकाच्या सुरवातीच्या ३० दिवसांपर्यंत पोंग्यात वाळू व चुना ९:१ या प्रमाणात टाकावे. एकरी १० पक्षीथांबे लावावेत. प्रतिबंधात्मक उपाय पिकाचे आणि इतर पर्यायी कीड वाढणाऱ्या झाडांचे अवशेष नष्ट करावेत. तसेच सुप्तावस्थेत अळी असलेले खोड छाटावे.
जैविक नियंत्रण
अंड्यांवर उपजीविका करण्याऱ्या ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची एकरी ५०,००० अंडी दहा दिवसांच्या
अंतराने तीनवेळा शेतात सोडावीत.
रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी)
लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम १२.६% लॅम्ब्डा सायलोथ्रीन ९.५% (झेडसी) @ २.५ मीली प्रती लीटर पाण्यात किंवा क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल १८.५ (एससी) @ ३ मीली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संकलन : विभागीय संशोधन केंद्र आणि ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्र इगतपुरी