Crop Management : पिकांवर अन्नद्रव्यांची कमतरता (Nutrient deficiency in crops) असल्यास, पिकाची वाढ योग्य पद्धतीने होत नाही आणि त्यावर वेगवेगळे रोग येतात. अन्नद्रव्यांच्या कमतरतेची (Crop Management) लक्षणे कोणती दिसून येतात? त्यावर काय उपाययोजना करावी, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...
अन्नद्रव्यांची कमतरता, पिकावरील लक्षणे आणि उपाय
१) नत्र : नत्राच्या कमतरतेमुळे झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची/झाडाची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.
उपाय : १% (१० लि. पाण्यात १०० ग्रॅम) युरियाची फवारणी करावी.
२) स्फुरद : स्फुरदच्या कमतरतेमुळे पाने हिरवट लांबट होऊन त्यांची वाढ खुंटते, पानाची मागील बाजू जांभळट होते.
उपाय : १ ते २% डीएपीची फवारणी करावी.
३) पालाश : पालाशच्या कमतरतेमुळे पानांच्या कडा तांबटसर होऊन पानावर तांबडे व पिवळे ठिपके पडतात, खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.
उपाय : १% सल्फेट ऑफ पोटॅशची फवारणी करावी.
४) लोह : लोहाच्या कमतरतेमुळे पिकाच्या शेंडाकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होतो, तसेच झाडाची वाढ खुंटते.
उपाय : ०.२% चिलेटेड लोहाची फवारणी करावी. तसेच २५ किलो फेरस सल्फेट प्रती हेक्टरी जमिनीतून द्यावे.
५) बोरॅान : बोरॅानच्या कमतरतेमुळे पिकाचा शेंडा/कोवळी पाने पांढरट होऊन मरतात, सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. फळांवर तांबडे ठिपके पडून भेगा पडतात.
उपाय : ०.५% बोरीक ॲसिडची फवारणी करावी.
६) जस्त : जस्ताच्या कमतरतेमुळे पाने लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि पाने वाळलेली दिसून येतात.
उपाय : ०.२% चिलेटेड झिंकची फवारणी करावी. तसेच १० ते २० किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टर जमिनीतून द्यावे.
७) मंगल : मंगलच्या कमतरतेमुळे पानांच्या शिरा हिरव्या परंतु शिरामधील भाग क्रमाक्रमाने पिवळा, पांढरट व करडा होतो. शेवटी पान फिकट होऊन गळते. उपाय : ०.२% चिलेटेड मंगलची फवारणी करावी. तसेच मँगनीज सल्फेट हेक्टरी १० ते २५ किलो जमिनीतून द्यावे.
८) मॅालिब्डेनम : मॅालिब्डेनमच्या कमतरतेमुळे पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात.
उपाय : हेक्टरी २५० ते ५०० ग्रॅम सोडियम मॅालिब्डेट जमिनीतून द्यावे.
९) तांबे : तांब्याच्या कमतरतेमुळे शेंड्यांची वाढ खुंटते, डायबॅक रोग होतो, पाने गळतात.
उपाय : ०.४% मोरचूद फवारावे.
१०) गंधक : गंधकाच्या कमतरतेमुळे पानांचा हिरवा रंग कमी कमी होत पाने पिवळी/पांढरी होतात.
उपाय : हेक्टरी २० ते ४० किलो गंधक शेणखताबरोबर दयावे.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ