Crop Management : रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या गहू, हरभरा, ज्वारी, मका पिकांसाठी पाणी व्यवस्थापन (Water Management) महत्वाची गोष्ट असते. जर या उपलब्ध पाण्याचा योग्य वेळी योग्य वापर केल्यास उत्पादनांतही वाढ होण्यास मदत होते. म्ह्णूनच पाण्याच्या पाळ्या खूप महत्वाच्या ठरतात. पाहुयात गहू, हरभरा, ज्वारी, मका पिकासह इतर पिकांसाठी पाणी किती आणि कधी द्यावे...
ज्वारीसाठी
ज्वारी पिकाची रब्बी हंगामातील (Rabbi Season) पाण्याची एकूण गरज ४० ते ४२ सेंटीमीटर असते आणि हे पाणी रब्बी ज्वारीला एकूण चार पाण्याच्या पाळयांमधून द्यावे. गर्भावस्था (पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी), वाढीची अवस्था (५० ते ५५ दिवसांनी), फुलोरा (७० ते ७५ दिवसांनी) व दाणे भरण्याची अवस्था (९० ते ९५ दिवसांनी) या संवेदनक्षम अवस्थांनुसार ज्वारी पिकास पाणी द्यावे.
गहू पिकासाठी
गहू पिकाची संपूर्ण कालावधीत पाण्याची एकूण गरज ४० ते ४५ सेंटीमीटर एवढी असते आणि ही गरज पाण्याच्या एकूण चार पाळयांमधून भागवावी. मुकुटमुळे फुटणे (पेरणीनंतर १८ ते २१ दिवसांनी), कांडी धरताना (३५ ते ४२ दिवसांनी), पीक ओंबीवर येताना (६० ते ६५ दिवसांनी) व दाणे चिकात असताना (पेरणीनंतर ८० ते ८५ दिवसांनी) या गव्हाच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था आहेत. या अवस्थांमधे गहू पिकास पाणी दयावे. ज्या शेतकरी बांधवांकडे गव्हासाठी एकच पाणी असेल त्यांनी ते कांडी धरताना द्यावे. दोन पाणी असतील तर पहिले पाणी मुकूटमुळे फुटताना आणि दुसरे पाणी पीक ओंबीवर येताना द्यावे. ज्या शेतकरी बांधवांकडे तीन पाणी असतील त्यांनी कांडी धरताना, मुकुटमुळे फुटताना आणि पीक ओंबीवर येताना ते द्यावेत.
मका पिकासाठी...
मका पिकाची पाण्याची एकूण गरज ४० ते ४५ सेंटीमीटर एवढी असते आणि ही गरज एकूण पाण्याच्या चार पाळयांमधून भागवावी. मक्याच्या ज्या संवेदनक्षम वेगवेगळ्या अवस्था आहेत त्यामध्ये रोप अवस्था (पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी), तुरा बाहेर पडताना (४५ ते ५० दिवसांनी), फुलोरा (६० ते ६५ दिवसांनी) आणि दाणे भरताना (७५ ते ८० दिवसांनी) या संवेदनक्षम अवस्थेत मका पिकास पाणी द्यावे.
हरभरा पिकासाठी...
हरभरा पिकाची पाण्याची एकूण गरज २५ ते ३० सेंटीमीटर एवढी असते आणि ही गरज एकूण दोन पाण्याच्या पाळयांमधून भागवावी. हरभरा पिकास फांद्या फुटताना (पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी) व घाटे भरताना (६० ते ६५ दिवसांनी) या संवेदनक्षम अवस्थांमधे पाणी द्यावे. ज्या शेतकरी बांधवांकडे हरभऱ्यासाठी एकच पाणी असेल त्यांनी ते पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी पिकास फांद्या फुटताना द्यावे.
करडई पिक्कासाठी...
करडई पिकाची पाण्याची एकूण गरज २५ ते ३० सेंटीमीटर एवढी असते आणि हे पाणी करडई पिकास दोन पाण्याच्या पाळयांमधून द्यावे. करडईची लुसलुशीत वाढीची अवस्था (पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी) व पीक फुलोऱ्यात असताना (५० ते ६० दिवसांनी) करडई पिकास पाणी द्यावे.
सूर्यफुलाची....
सूर्यफुलाची पाण्याची एकूण गरज ३० ते ३५ सेंटीमीटर असते. ही पाण्याची गरज एकूण चार पाळयांमधून भागवावी. रोपावस्था (पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी), फुलकळ्या लागण्याची अवस्था (३० ते ३५ दिवसांनी), पीक फुलोऱ्यात असताना (४५ ते ५० दिवसांनी) व दाणे भरताना (६० ते ६५ दिवसांनी) या संवेदनक्षम अवस्थांमधे सूर्यफूलास पाणी दयावे.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त शास्रज्ञ कृषी विद्यापीठ