Intercropping In Sugarcane : उसामध्ये आंतरपीक (Intercropping In Sugarcane) म्हणून मुगाची फुले सुवर्ण या जातीची लागवड करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सडे गावातील प्रगतशील शेतकरी प्रमोद धोंडे यांनी त्यांच्या एक हेक्टर क्षेत्रावर अभिनव प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) द्वारा मुगाची फुले सुवर्ण ही जात नुकतीच (Mung Bean) प्रसारित केलेली आहे.
शेतकरी पाण्याची बचत व्हावी, म्हणून ठिबक संच बसवतो आणि त्यामुळे पाण्याची बचत (save Water) होऊन पिकाचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. अशाच प्रकारे जर उसामध्ये मूग आंतरपीक म्हणून लावल्यास देखील पाण्याची चांगली बचत होऊ शकते. कारण मूंग हे मुख्य कडधान्य पीक असल्याने हवेतून मोठ्या प्रमाणावर नत्र शोषण करून ते नत्र इतर पिकांना उपलब्ध करून देण्याची क्षमता या पिकामध्ये आहे. म्हणजेच जसं ठिबक संच पाण्याचा सीमित वापर पिकासाठी करतात. अगदी तसाच उपयोग मूग हे पिक मुख्य पिकास नत्र पुरवठा करत असल्याने नत्रयुक्त खताची मोठी बचत या पिकामुळे होत असते आणि मुख्य पिकाला त्याचा फायदा होतो.
मूग हे पिक 65 दिवसांमध्ये येणारे पीक आहे. जवळजवळ 50 दिवस हे पीक मुख्य पिकाला रोजच्या रोज हळुवारपणे हवेतील नत्र पुरवठा करण्याचं काम अविरतपणे करते. त्यामुळे मुख्य पीक ऊसाला नत्राची मात्राची गरज लागणार नाही. मुग हे पीक एक सलाईन सारखं काम करत असल्या उसाच्या उत्पादनात भरीव वाढ झालेली आपल्या लक्षात येईल. शिवाय नत्रामुळे मुख्य पीक जोमदार वाढत असून त्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. शिवाय शेतकऱ्यांना दुय्यम पीक म्हणून तर उत्पन्न मिळेलच परंतु मुख्य पिकाला पोषक घटक मिळतील.
पीक जोमदार स्थितीत
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ममुराबाद (जळगाव) येथील संशोधन केंद्राने विकसित केलेल्या मुगाचे फुले सुवर्ण' या वाणाची राहुरी (अहमदनगर) तालुक्यातील सडे येथील प्रमोद धोंडे यांनी २१ सप्टेंबर रोजी लागवड केली. उसामध्ये आंतरपीक म्हणून या वाणाची लागवड केल्यानंतर पीक जोमदार स्थितीत आहे. कीड, रोगमुक्त असल्याने त्याची वाढही चांगली होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उसाखाली असणाऱ्या १३ लाख हेक्टर क्षेत्रात या वाणाची लागवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केळीतही असाच प्रयोग
असाच प्रयोग खान्देशात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड होत असलेल्या केळीमध्ये करू शकतो. कडधान्य पीक आंतरपीक म्हणून घेण्याचा प्रयोग भविष्यात केल्यास फार मोठ्या प्रमाणावर आपण नत्र युक्त रासायनिक खतावर होणारा खर्च बचत करू शकतो आणि त्यामुळे परकीय चलन वाचवू शकतो. शेतकरी बंधूंनी असेच प्रयोग घेऊन आपले शेती उत्पन्न, शेती उत्पादना वरील खर्च कमी करून वाढवावा हाच यामागे उद्देश आहे.
- प्रा. डॉ. सुमेरसिंग राजपूत, उडीद व मूग पैदासकार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी