Join us

नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात स्ट्रॉबेरी फुलतेयं! शेतकरी बांधवाना आधार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 8:13 PM

नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण तालुक्यांतील आदिवासी बांधवांना रोजगाराचा नवा मार्ग मिळाला आहे.

नाशिक : लालचुटुक व तोंडाला पाणी आणणारी स्ट्रॉबेरी सध्या चांगलाच भाव खाऊन जात आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण आदी तालुक्यांत स्ट्रॉबेरीची मोठी लागवड होताना दिसून येत आहे. त्यामुळे या तालुक्यांतील आदिवासी बांधवांना रोजगाराचा नवा मार्ग मिळाला आहे. 

सुरगाणा व कळवण तालुक्यातील काही भागांतील पिके, फळे, रानभाज्या जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण बनल्या आहेत त्यामध्ये रस्त्याच्या कडेला छोट्या दुकानातील लालबुंद स्ट्रॉबेरी आता येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकांचे लक्ष वेधून घेत आहे. या स्ट्रॉबेरीने आदिवासी भागातील जनतेला व शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला आहे. तालुक्यातील काही भागांत थंडीच्या हंगामात स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्याने या पिकाला चांगला बहर येत आहे. लाल गुलाबी रंगाची, गोड आंबट चवीची छोट्या कागदाच्या खोक्यामधील स्ट्रॉबेरी पाहिल्यावर प्रत्येकाच्या तोडाला पाणी सुटते. थंडीच्या दिवसांत आरोग्यदायी असणाऱ्या स्ट्रॉबेरीला चांगली मागणी असते. 

थंडीचा हंगाम सरूनही थंडी जाणवत असल्याने या पिकाला चांगला बहर आला असून, आदिवासी भागातील शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. काही शेतकरी मोठ्या घाऊक व्यापारी वर्गाला माल देतात. काही मुंबई, गुजरात व महाराष्ट्रातील विविध भागांत विक्रीसाठी पाठवितात; परंतु काहींना तत्काळ नगदी पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी वणी, सापुतारा, विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी छोटी दुकाने थाटून स्ट्रॉबेरी विक्रीसाठी ठेवतात. या विक्रीतून परिसरातील आदिवासी शेतकरी बांधवांना चांगल्यापैकी अर्थार्जन होऊ लागले आहे. पेठ, कळवण, सुरगाणा, ननाशी घाटाजवळील काही भाग, तसेच घाटमाथ्यावरील लाल मातीत पिकणारी लालभडक आंबट-गोड स्ट्रॉबेरी वणी, सापुतरा, सप्तश्रृंगी गड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी दिसत असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करीत आहे.

पोषक जमिनीमुळे फायदा

स्ट्रॉबेरी हे पीक साधारणपणे कळवण, सुरगाणा, पेठ आदी भागांत मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कारण, या भागातील जमिनीतील माती ही लाल स्वरूपाची असल्याने ती या पिकांच्या पोषकांला महत्त्वाची मानली जाते. पीकही जोमाने येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीचे पीक घेऊ लागला आहे. परिणामी, दिडोरी तालुक्यातील काही भागांत स्ट्रॉबेरी पिकांचे क्षेत्र वाढू लागले आहे. या भागातील शेतकरीवर्ग नगदी भांडवल मिळवून देणारे पीक म्हणून स्ट्रॉबेरीकडे आशेने पाहू लागला आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीमार्केट यार्डशेतकरी