Join us

सौर कृषिपंपाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी, तर महाऊर्जाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By गोकुळ पवार | Published: November 30, 2023 10:46 AM

Solar Farm Pump Scheme : सौर पॅनल बसूनही पुरेशा प्रेशरने वीज मिळत नसल्याने सिंचनाला पाणी देण्यासाठी वाट पाहावी लागते.

नाशिक : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचन करण्यासाठी राज्य सरकार सौरपंप उपलब्ध करून देत आहे. जुने डिझेल आणि इलेक्ट्रिक पंप सोलर पंपमध्ये रूपांतरित करण्याची देखील सुविधा देण्यात आली आहे. नवीन सौर पंप बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनुदान दिले जात असून नाशिक जिल्ह्यात पाच हजाराच्या पुढे सौरकृषी पंपधारक आहेत.

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषिपंप या योजनेंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना जिल्हानिहाय कृषिपंप देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत पुढील 3 वर्षात 1 लाख पंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री सौर पंप योजनेस फेब्रुवारी 2019 पासून सौर पंप बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नाशिक विभागात आत्तापर्यंत सतरा हजारंपेक्षा अधिक सौर कृषी पंप देण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील सौर कृषी पंप धारकांची संख्या 5 हजार 21 इतकी आहे. नाशिक जिल्ह्यात ही सर्वाधिक संख्या आहे.

सौर पॅनल बसूनही पुरेशा प्रेशरने वीज मिळत नसल्याने सिंचनाला पाणी देण्यासाठी वाट पाहावी लागते. एक तर कृषी पंपासाठी वीज मिळत नाही, सौरपंप दिले तर ते चालत नाही, अशी अडचण असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाऊर्जाच्या माध्यमातून राबवली जाते. यासाठी या यंत्रणाकडेच अर्ज करावा लागतो. यातील बरेचसे शेतकऱ्यांकडून सौर ऊर्जेचा दाब मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. मात्र शेतकऱ्यांनी सौर पॅनलवरील धूळ धुवून काढणे आवश्यक असते. याशिवाय 200 फुटापर्यंतच बोरवेलचे पाणी खेचण्याची पंपाची क्षमता असते, याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे महाऊर्जाकडून सांगण्यात आले.

काय आहे ही योजना 

या योजनेअंतर्गत राज्यातील कृषी पंप शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करून दिले जात आहे. सौर पंप योजना अंतर्गत राज्य सरकार पंपाच्या किमतीच्या 95% अनुदान दिले जाते. तर लाभार्थी फक्त 5% अनुदान भरतात. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून पात्र शेतकऱ्यांना सौर पंप प्रदान केले जातात. पाच एकर पेक्षा कमी जमीन असलेल्या सर्व शेतकऱ्यांना तीन एचपी पंप आणि मोठ्या शेतासाठी पाच एचपी पंप मिळण्याची ही योजना आहे.

शेतकऱ्यांचं म्हणणं काय?

तर सिंचनासाठी सौर कृषी पंपाचा उपयोग होईल असे वाटले होते, परंतु बोरवेलचे पाणी चढत नसल्याने पंप शेतीची कामे होत नाही. प्रेशर नसल्याने पाणी पुरेसे मिळत नाही. त्यामुळे योजनेचा उपयोग काय असा सवाल शेतकरी कारभारी वाळूंज यांनी उपस्थित केला. तर शेतकरी रावसाहेब जांभोर म्हणाले की 24 तास 20 उपलब्ध होईल, असे सांगितले जात होते. परंतु प्रत्यक्षात पुरेसा दाबाने वीज मिळत नसल्याने बोरवेल मधून पाणी मिळणार मिळण्याला अडचणी येत आहेत.  विहिरीचे पाणी आटल्यावर विहिरींचेही पाणी मिळणार नाही असं ते म्हणाले. 

टॅग्स :शेतीनाशिकशेतकरी