Join us

कमी पाण्यात एकाचवेळी मिश्र पिकांचा प्रयोग, शेतकऱ्याची यशस्वी शेती 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 9:32 AM

'एक थेंब अधिक पिके' या मोहिमेत पाचोरा येथील शेतकरी दाम्पत्याने सूक्ष्म जलसिंचन योजनेतून एकाच वेळी मिश्र पिके घेऊन भरघोस उत्पन्न मिळविले आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेत 'एक थेंब अधिक पिके' या मोहिमेत पाचोरा येथील बापूराव बडगुजर पत्नी ज्योती बडगुजर यांनी सूक्ष्म जलसिंचन योजनेतून एकाच वेळी मिश्र पिके घेऊन भरघोस उत्पन्न मिळविले आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे दोघांना 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रीय कृषी विकास कृषी विभागामार्फत त्यांना ऑनलाइन निमंत्रण प्राप्त झाले आहे.

ठिबक सिंचन योजनेत त्यांनी आपल्या 18 एकर शेतीमध्ये एकाच वेळी सूक्ष्म जलसिंचन योजना राबवून मिश्र शेती करीत दोनवेळा उत्पन्न घेतले. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा केळीसारख्या बागायती पिकाला उपयोग करून पाण्याची बचत केली. त्यातच कांद्याची लागवड करीत मिश्र पिके घेतली. गहू, हरभरा, मोसंबी, मका, कापूस, आदी बागायत पिके मिश्र स्वरूपात घेतले आहे. आपले शेतशिवार बडगुजर दाम्पत्याने सूक्ष्म जलसिंचनाखाली आणून शेतकऱ्यांपुढे, आदर्श निर्माण केला आहे. याची राष्ट्रीय कृषी विभागाने दखल घेतली. प्रयोगशील शेती करून बापूराव बडगुजर यांनी रासायनिक खताला तिलांजली दिली. 

सेंद्रिय खते व शेणखताचा शंभर टक्के वापर करून मिश्र पिके घेत अधिकचे उत्पन्न मिळविले यामुळे शेतीही नफ्यात आली. सेंद्रिय खते व ठिबक सिंचनावर मिश्र पिके घेऊन अधिक उत्पन्न घेतल्याने शेती नफ्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग केला, यामुळे वेळ आणि पैशांची बचत झाली. यातून भरघोस उत्पन्न मिळाले, प्रजासत्ताक दिनासाठी आलेले निमंत्रण म्हणजे प्रयोगशील शेतीचा हा सन्मान असल्याचे शेतकरी बापूराव बडगुजर यांनी सांगितले.

प्रजासत्ताक दिनी सन्मान 

राज्यातील 10 शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (प्रति थेंब अधिक पीक) विशेष पाहुणे म्हणून राज्यातर्फे निवडण्यात आले आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या व प्रभावीपणे काम केलेल्या शेतक-यांची या सोहळ्यासाठी निवड करण्यात आली आहे. राज्यातील 10 शेतकऱ्यांना (सपत्नीक) उपस्थितीचे निमंत्रण देण्यात आले आहे, त्यात पाचोरा येथील बापूराव बडगुजर व ज्योती बडगुजर यांचा समावेश आहे. येत्या 24 ते 26 जानेवारी दरम्यान त्यांना शासनातर्फे दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले आहे. याबद्दल बडगुजर दाम्पत्याचे परिसरातून कौतुक होत आहे. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीप्रजासत्ताक दिनशेतकरी