Join us

जलकुंडांमुळे सातपुड्यातील डोंगरमाथ्यावर शेती फुलली अन् आदिवासी शेतकऱ्यांचं स्थलांतर थांबलं! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 7:06 PM

डोंगरावरील दरीतून झिरपणारे पाणी नळीद्वारे दीड किलोमीटर अंतरावरून आणून त्याची साठवणूक जलकुंडात केली.

नंदुरबार : सातपुड्यातील शेती ही उंच सखल भागात हंगाम संपल्यानंतर आपल्या शेतीला आधार होईल असे पीक घेता येत नाही. परिणामी मजुरीसाठी ते स्थलांतर करतात. आता मात्र, अनेक गावात शेतकरी जलकुंडाच्या आधारे शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी परिसरात ११ गावांतील १८ पाड्यांमध्ये २०० जलकुंड तयार करण्यात आले असून येथील शेतकऱ्यांना जलकुंडाच्या माध्यमातून शेती फुलविण्यात यश आले आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात आजही दुर्गम आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांपर्यंत जेमतेम पायाभूत सुविधा पोहचल्या आजही अनेक भागातील स्थलांतर थांबलेले नाही. मात्र याच सातपुड्याच्या डोंगरमाथ्यावरील उताराच्या भागात शेतकऱ्यांचे शेत हिरवेगार करण्यासाठी जलकुंड एक आधार ठरत असून हिरव्या पालेभाज्यांना बहार आणत आहे. जलकुंडाच्या साहाय्याने शेतकरी विविध फळभाज्यांची पिके घेत असून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. मोलगी परिसरातील अनेक गावांत जलकुंडावर आधारित शेती ही नवीन संकल्पना विकसित होताना दिसत आहे. पाणी हेच जीवन आहे. पाण्याचा सुयोग्य वापर करून जलकुंडावर आधारित शेती हे उत्तम उदाहरण ठरू पाहत आहे. डोंगरमाथ्यावर जलकुंड ही संकल्पना उंचसखल भागातील शेतीकरिता महत्त्वपूर्ण ठरत आहे.

रीड्स भारत संस्था व मोलगी परिसर सेवा समितीच्या सहकार्याने कमी पाण्यात शेती कशी करावी, या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या भागात जलकुंडावर आधारित शेतीचा प्रयोग गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून शेतकरी भरघोस उत्पन्न घेत आहेत. जलकुंड पाच मीटर लांब चार मीटर रुंद व दोन मीटर खोल असून त्यात जवळपास ४० हजार लिटर पाणी मावते. जलकुंड तयार केल्यावर त्यात टाकण्यासाठी जाड लेअरचे प्लास्टिक आच्छादन केले जाते. नैसर्गिक जलस्रोतातून सायफन पद्धतीने साठवलेले पाणी पाइप व ठिबकच्या साहाय्याने भाजीपाल्यास दिले जाते. 

जलकुंडाचा पहिला प्रयोग जुनवाणीत

दरम्यान मोलगी परिसरातील जुनवाणी गावातील ओल्या पाडवी यांनी पहिल्यांदा जलकुंडाचा प्रयोग केला. त्यांनी बाहागोया डोंगरावरील दरीतून झिरपणारे पाणी नळीद्वारे दीड किलोमीटर अंतरावरून आणून त्याची साठवणूक जलकुंडात केली. त्याचा उपयोग उताराच्या जागेत करून त्यांनी दोनशे आंब्यांची झाडे जगवली. या पाण्यावर त्यांनी वांगी, टमाटर, कोथिंबीर, भाजीपाला लावून उत्पन्न घेत आहेत. त्यामुळे घरच्या घरी भाजीपाला उपलब्ध झाला असून  गावातच भाजीपाला विक्री करत असतात. 

शेतीला जलकुंडाचा चांगला आधार 

येथील शेतकरी ओल्या पाडवी म्हणाले  कि, मोलगी परिसरातील २०० शेतकऱ्यांना आपल्या डोंगराळ भागात असलेल्या शेतीला जलकुंडाचा चांगला आधार मिळाला असून जलकुंडाद्वारे त्यांनी कोबी, मिरची, वांगे, टमाटे लागवड केली आहेत. डाबसारख्या गावांत स्ट्रॉबेरीचे पीकही घेतले जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यास जलकुंड आधार ठरत आहेत. जलकुंड ही संकल्पना कमी पाण्यात शेती कशी करावी याचा उत्तम नमुना असून त्याचा उपयोगाने आज मी डोंगराळ भागात २०० आंब्याची झाडे जगवली असून माझ्यासाठी जलकुंड हे वरदानच ठरले आहे.

शेती सिंचनाचे प्रयोग यशस्वी 

रिडस् संस्थेच्या विभागीय प्रकल्प समन्वयक जुही पेठे म्हणाल्या कि, जलकुंड हा शेततळ्यांचा प्रकार असून तो लहान स्वरूपाचा आहे. मेघालयात अशा प्रकारची योजना राबवून तेथील शेती सिंचनाचे प्रयोग सुरू आहे. त्याच संकल्पनेतून सातपुड्यातील शेतकऱ्यांनी ही हा प्रयोग करावा, म्हणून सुरुवातीस चार जलकुंड यशस्वी झाल्यावर परिसरात आता २०० जलकुंड झाली आहेत. शेतकऱ्यांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत झाली आहे.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीशेतकरीनंदुरबारपाणीकपात