Join us

पिकावरील कीड व रोग नियंत्रणासाठी 'हे' सोपे उपाय कराच, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 2:03 PM

उपयुक्त बुरशी आणि जीवाणू पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करण्याबरोबरच कीड व रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.

जमिनीत नैसर्गिकरीत्या उपलब्ध उपयुक्त जैविक घटक; जसे उपयुक्त बुरशी, जीवाणू यांचे पीक उत्पादनात मोठे योगदान असते. उपयुक्त बुरशी आणि जीवाणू पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करण्याबरोबरच कीड व रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. अशा जैविक घटकांचे प्रमाण पिकांत कृत्रिमरीत्या वाढविल्यास ते पीक उत्पादनवाढीस उपयुक्त ठरतात. याचबरोबर, कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्यास प्रतिबंध होतो व प्रादुर्भाव नियंत्रणास मदत होते.

कीड व रोग नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशी व जीवाणू

ट्रायकोडर्मा व्हीरीडी, सुडोमोनस फ्ल्युरेसेन्स, व्हर्टिसिलियम लेकॅनी, बिव्हेरिया बॅसियाना, मेटा-हायझीयम अॅनीसोफ्ली, नोमूरिया रिलेई, बॅसिलस सबटीलीसपेंसिलोमायसीस लिलॅसिनस

ट्रायकोडर्मा व्हीरीडी

जमिनीमध्ये असणाऱ्या हानिकारक बुरशीमुळे (फ्युजॅरीयम, स्लेरोशियम, पिथीयम, फायटोप्थोरा) पिकांना मर, मूळकुज इ. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. या रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा बुरशी अतिशय परिणामकारक आहे. ट्रायकोडर्मा बुरशी हानिकारक बुरशींची वाढ होण्यास प्रतिबंध करते, पर्यायाने पिकांचे या हानिकारक बुरशीपासून बचाव करते.

ट्रायकोडर्मा व्हीरीडी वापरण्याची पद्धत

बीजप्रक्रिया करण्यासाठी २५ मिली जैविक बुरशी व १०० मिली गुळाचे द्रावण प्रतिकिलो बियाण्यांसाठी वापरावे, जैविक बुरशीने प्रक्रिया केलेले बियाणे स्वच्छ कापडावर किंवा कागदावर पसरावे. सावलीत वाळवून लगेच पेरावे, रोपांसाठी जैविक बुरशी वापरण्यासाठी रोपांची मुळे १०० मिली जैविक बुरशी व १० ली. पाणी द्रावणात ३० मिनिटे बुडवून पुनर्लागवड करावी.  मर रोग नियंत्रण तसेच सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी २ ली. जैविक बुरशीनाशक २०० ली. पाण्यात जमिनीतून द्यावे.

सुडोमोनस फ्ल्युरेसेन्स

जमिनीमध्ये हानिकारक बुरशीमुळे मर, कुज, पानांवरील ठिपके इ. रोगांचा प्रादुर्भाव होतो. या रोगांचे नियंत्रण सुडोमोनस जीवाणूमुळे होते. सुडोमोनस उपयुक्त जीवाणूंमुळे हानिकारक बुरशींची वाढ होण्यास प्रतिबंध होतो, त्यामुळे पिकांसाठी लाभदायक आहे.

सुडोमोनस फ्ल्यूरेसेन्स वापरण्याची पद्धत

१०० मिली सुडोमोनस व १० ली. पाण्याच्या द्रावणात रोपे ३० मिनिटे बुडवून पुनर्लागवड करावी. मर, कुज व पानांवरील ठिपके नियंत्रणासाठी जमिनीतून तसेच फवारणीसाठी २ ली. सुडोमोनस २०० ली. पाण्यासाठी वापरावे.

व्हर्टिसिलियम लेकॅनी

फळझाडे, फुलझाडे, तृणधान्य, कडधान्य व भाजीपाला पिकांवरील मावा, फुलकिडे, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, लाल कोळी, तुडतुडे इ. रसशोषक किडींचे प्रभावी नियंत्रण व्हर्टिसिलियम लेकॅनी या परोपजीवी बुरशीमुळे होते. रस शोषणाऱ्या किडींच्या शरीरातून चिकट द्रव पाझरत असतो. व्हर्टिसिलियम लेकॅनी बुरशी किड्यांच्या शरीरात कवकतंतू पसरून त्यातील स्रावावर जगतात आणि कालांतराने किडी मरतात.

व्हर्टिसिलियम लेकॅनी वापरण्याची पद्धत२ ली. व्हर्टिसिलियम २०० ली. पाण्यात मिसळून सायंकाळी फवारणी करावी.

बिव्हेरिया बॅसियाना

ऊस, कापूस, भुईमूग, भाजीपाला पिकांना जमिनीतील किडींचा प्रादुर्भाव होतो. विशेषतः ह्युमणी, मुळ्या खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव झाल्याचे पीक वाळल्यानंतर लक्षात येते. त्यासाठी उपयुक्त बिव्हेरिया बॅसियाना ही अत्यंत प्रभावी बुरशी आहे. बिव्हेरिया ही कीटकनाशक गुणधर्म असलेली परोपजीवी बुरशी असून जमिनीतील ह्युमणी, मुळ्या खाणारी अळी आणि काळी अळी यांच्या शरीरात प्रवेश करून त्यातील अन्नरस शोषण करतात व वेगाने वाढतात, त्यामुळे अळीची हालचाल मंदावते, भूक कमी होते व कालांतराने अळी मरते. मेलेल्या अळीच्या शरीरावर पांढरी कापसासारखी बिव्हेरिया बुरशीची वाढ दिसून येते.

बिव्हेरिया बॅसियाना वापरण्याची पद्धत

२ ली. बिव्हेरिया २०० ली. पाण्यात मिसळून सायंकाळी फवारणी करावी. ह्युमणीच्या प्रभावी नियंत्रणासाठी २ ली. बव्हेरिया २०० ली. पाण्यात मिसळून जमिनीतून द्यावे. प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात २ ली. बिव्हेरिया २०० ली. पाण्यात मिसळून खोडांच्या भोवती टाकावे.

मेटा-हऱ्हायझीयम अॅनीसोफ्ली

फळझाडे, फुलझाडे आणि भाजीपाला पिकांवरील विशेषतः वाळवी, ह्युमणी यांच्या नियंत्रणाकरिता या परोपजीवी बुरशीचा वापर केला जातो. मेटा-हायझीयम बुरशीमुळे किडींना ग्रीन मस्करडाईन नावाचा रोग होतो, त्यामुळे कीड मरते.

व्हर्टिसिलियम लेकॅनी वापरण्याची पद्धत

२ ली. व्हर्टिसिलियम २०० ली. पाण्यात मिसळून सायंकाळी फवारणी करावी.

बिव्हेरिया बॅसियाना

ऊस, कापूस, भुईमूग, भाजीपाला पिकांना जमिनीतील किडींचा प्रादुर्भाव होतो. विशेषतः ह्युमणी, मुळ्या खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव झाल्याचे पीक वाळल्यानंतर लक्षात येते. त्यासाठी उपयुक्त बिव्हेरिया बॅसियाना ही अत्यंत प्रभावी बुरशी आहे. बिव्हेरिया ही कीटकनाशक गुणधर्म असलेली परोपजीवी बुरशी असून जमिनीतील ह्युमणी, मुळ्या खाणारी अळी आणि काळी अळी यांच्या शरीरात प्रवेश करून त्यातील अन्नरस शोषण करतात व वेगाने वाढतात, त्यामुळे अळीची हालचाल मंदावते, भूक कमी होते व कालांतराने अळी मरते. मेलेल्या अळीच्या शरीरावर पांढरी कापसासारखी बिव्हेरिया बुरशीची वाढ दिसून येते.

बिव्हेरिया बॅसियाना वापरण्याची पद्धत

२ ली. बिव्हेरिया २०० ली. पाण्यात मिसळून सायंकाळी फवारणी करावी. ह्युमणीच्या प्रभावी नियंत्रणासाठी २ ली. बव्हेरिया २०० ली. पाण्यात मिसळून जमिनीतून द्यावे.  प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात २ ली. बिव्हेरिया २०० ली. पाण्यात मिसळून खोडांच्या भोवती टाकावे.

मेटा-हऱ्हायझीयम अॅनीसोफ्ली

फळझाडे, फुलझाडे आणि भाजीपाला पिकांवरील विशेषतः वाळवी, ह्युमणी  यांच्या नियंत्रणाकरिता या परोपजीवी बुरशीचा वापर केला जातो. मेटा-हायझीयम बुरशीमुळे किडींना ग्रीन मस्करडाईन नावाचा रोग होतो, त्यामुळे कीड मरते.

मेटा-हायझीयम अॅनीसोफ्ली वापरण्याची पद्धत२ ली. मेटा-हायझीयम २०० ली. पाण्यात मिसळून सायंकाळी फवारणी करावी. प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात २ ली. मेटा-हायझीयम २०० ली. पाण्यात मिसळून खोडांच्या भोवती टाकावे.

नोमूरिया रिलेई

पिकांवरील अळीयगींय किडींचे नोमूरिया रिलेई या परोपजीवी बुरशीमुळे प्रभावीपणे नियंत्रण होते. या बुरशीचे तंतू अळीच्या बाह्य अंगातील रंध्रातून प्रवेश करतात आणि संपूर्ण शरीरावर पसरते. कालांतराने किडी मरतात. सर्व पिकांवरील अळीवर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी नोमूरिया रिलेई परिणामकारक जैविक कीटकनाशक आहे.

नोमूरिया रिलेई वापरण्याची पद्धत

२ ली. नोमूरिया रिलेई २०० ली. पाण्यात मिसळून सायंकाळी फवारणी करावी.

बॅसिलस सबटिलीस

बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोग विशेषतः मूळकूज, करपा, डाऊनी मिल्ड्यू, ब्लाईट इ. रोगांचे बॅसिलस सबटिलीस जीवाणू प्रभावीपणे नियंत्रण करते, बॅसिलस सबटिलीस जीवाणू पिकाच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ करते, तसेच वाढ करणाऱ्या संजीवकांची (उदा. आयएए, आयबीएस) निर्मिती वाढवते. पिकांच्या मुळांच्या वाढीला चालना देते.

बॅसिलस सबटिलीस वापरण्याची पद्धत२ ली. बॅसिलस सबटिलीस २०० ली. पाण्यात मिसळून जमिनीतून तसेच फवारणीसाठी वापरावे.

पॅसिलोमायसीस लिलॅसिनस

बियाण्यांमधून उद्भवणाऱ्या रोगांपासून व सूत्रकृमींपासून या बुरशीमुळे पिकांचे संरक्षण होते. सूत्रकृमीचा प्रादुर्भाव झाल्यास मुळांवर गाठी येतात व मुळांची कार्यक्षमता कमी होत जाते. यासाठी ही बुरशी एक प्रभावी जैविक सूत्रकृमिनाशक ठरली आहे.

पॅसिलोमायसीस लिलॅसिनस वापरण्याची पद्धत

रोपांसाठी जैविक सूत्रकृमिनाशक वापरण्यासाठी रोपांची मुळे १०० मिली जैविक सूत्रकृ‌मिनाशक वनाशक वापरण्या द्रावणात ३० मिनिटे बुडवून पुनर्लागवड करावी. सूत्रकृमी नियंत्रणासाठी जमिनीतून २ ली. जैविक सूत्रकृमिनाशक २०० ली. पाण्यातून द्यावे.

जैविक रोग व कीटकनाशके वाढविण्याची घरगुती पद्धत

२० ली. क्षमतेचा प्लास्टिक ड्रम घ्यावा. अर्ध्या ड्रममध्ये ताजे शेण, १ किलो डाळीचे पीठ व १ ली. जैविक घटकांचे मातृवाण टाकावे. त्यानंतर ड्रम पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत पाणी टाकावे. ड्रममधील द्रावण काठीने रोज हलवावे. ड्रममध्ये हवा खेळती राहील अशा पद्धतीने गोणपाटाने झाकून सावलीत ठेवावा. सदरचे द्रावण १० दिवस अंबवावे व एकरी २ लीटर द्रावण २०० लीटर पाण्यातून जमिनीतून द्यावे किंवा पिकांवर फवारणी करावी.

१ टन कुजलेल्या सेंद्रिय खतांमध्ये ट्रायकोडर्मा व्हीरीडी, बव्हेरिया बॅसियाना, पॅसिलोमायसीस, मेटाहायझीयम अॅन्सीपोलेनी व नामोरिया रिली प्रत्येकी १ ली. मिसळून लागवडीच्या वेळी टाकावे. या प्रकारे उपयुक्त जैविक घटकांची वाढ करून शेतात नियमित वापर करावा. त्यामुळे त्यांचा दीर्घकाळ प्रभाव राहतो. पिकांमध्ये जैविक बुरशी व कीटकनाशकांमुळे जमीन, पिके विषमुक्त राहतात व उत्पादन खर्च कमी होतो.

टीप : जैविक घटकांसोबत कोणतेही रासायनिक बुरशी व कीटकनाशके एकत्रित मिसळू नये.जैविक घटक वापरल्यानंतर ८ ते १० दिवस कोणतेही रासायनिक बुरशी व कीटकनाशके वापरू नये.

संपादक : डॉ. नितीन ठोके, वरिष्ठ शास्त्रखज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.

टॅग्स :शेतीनाशिकखतेशेतकरी