Join us

Gahu Tambera Management : गव्हावर नारंगी आणि काळा तांबेरा आलाय, असे करा व्यवस्थापन? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:28 IST

Gahu Tambera Management : गहू पिकावरील तांबेरा रोग व त्यांचे व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती घेणे फायद्याचे ठरणार आहे.

Gahu Tambera Management : यंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी (Wheat Crop) पोषक राहिलेला आहे. सुरुवातीला थंडी कमी असली तरी गेल्या महिनाभरापासून पिक वाढीसाठी आवश्यक थंडी पडलेली आहे. हंगामातील न्यूनतम तापमान या महिन्यात अनेक ठिकाणी १० डिग्री सें. पेक्षा कमी राहिले तसेच निरभ्र आकाश राहिल्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश मिळून गहू पिकाच्या (Gahu Pik Vyavsthapan) वाढ चांगली झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या कारणांमुळे गहू पिकाची उत्पादकता कमी होऊ शकते त्याचे मुख्य कारण गहू पिकावरील रोग हे असू शकते. त्यामुळेच गहू पिकावरील रोग व त्यांचे व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती घेणे फायद्याचे ठरणार आहे.

गव्हावरील तांबेरा (Gahu Tambera Rog) हा सर्वात महत्वाचा रोग असून या रोगाची लागण झाल्यानंतर दुर्लक्ष केल्यास ८० ते १०० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट झाल्याचे दिसून आलेले आहे. ढगाळ हवामान, वातावरणात भरपूर आद्रता अशाप्रकारचे पोषक हवामान असल्यास तांबेरा रोगास बळी पडणाऱ्या गव्हाच्या वाणांवर या रोगाचा  हमखास प्रादुर्भाव होतो. 

गहू पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत असतांना या रोगाची लागण झाल्यास गव्हाच्या दाण्यांना सुरकुत्या पडून त्याच्या झिऱ्या होऊन मोठ्या प्रमाणात नुकसानीची शक्यता असते. नुकसान टाळण्यासाठी तांबेरा रोग व त्याचे व्यवस्थापन या विषयी माहिती असणे गरजेचे आहे. आपल्या राज्यात दोन प्रकारच्या तांबेरा रोगांचा गव्हावर प्रादुर्भाव होतो. सुरवातीच्या काळात नारंगी तांबेरा व नंतरच्या काळात म्हणजेच तापमान वाढल्यानंतर साधारण फेब्रुवारी महिना संपत असतांना काळा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो.

नारंगी किंवा पानावरील तांबेरा : 

  • हा रोग पक्षीनिया ट्रीटीसीना या बुरशीमुळे होतो. 
  • रोगाची लागण हवेद्वारे वाहून आलेल्या बुरशीच्या बिजाणुंमुळे होते. 
  • रोगाची लागण होण्यासाठी १५ ते २५ सें.ग्रे तापमान तसेच पानावर किमान ३ तास दव साठलेले असावे लागते. 
  • प्राथमिक अवस्थेत नारंगी तांबेरा प्रामुख्याने पानाच्या वरच्या भागावर दिसून येतो. 
  • रोगाची लागण झाल्यावर पानावर गोलाकार ते अंडाकृती आकाराचे लहान लहान ठिपके दिसून येतात. 
  • अनुकूल हवामानात ठिपक्यांच्या जागी असंख्य बीजाणू तयार होऊन ठिपक्यांचा रंग नारंगी ते गर्द नारंगी दिसू लागतो. 
  • अशा रोगग्रस्त पानावरून बोट फिरवल्यास नारंगी रंगाची पावडर बोटावर दिसून येते. 
  • फुलोऱ्यापूर्वीच्या अवस्थेत रोगाची लागण झाल्यास ८० टक्केपर्यंत तर बाल्यावस्थेत लागण झाल्यास १०० टक्केपर्यंत उत्पादनात घट येते.

 

काळा किंवा खोडावरील तांबेरा : 

  • काळा तांबेरा हा पक्षीनिया ग्रामिणीस ट्रीटीसाय या बुरशीमुळे होणारा रोग आपल्या देशातील मध्य, पूर्व व दक्षिण भाग जेथे हिवाळ्यातील तापमान उत्तर भागाच्या तुलनेत जास्त असते अशा ठिकाणी आढळून येतो. 
  • या रोगाचा प्रादुर्भाव हवेद्वारे वाहून आलेल्या बिजाणुंमुळे पानाच्या खालच्या व वरच्या बाजूवर होतो. 
  • मात्र अनुकूल हवामानात रोगाचा प्रादुर्भाव खोडावर, देठावर, ओंबीवर तसेच कुसळावर देखील आढळून येतो. 
  • पानावर किमान ६ ते ८ तास ओलावा किंवा दव साचलेले असल्यास व तापमान १५ ते २४ सें.ग्रे. असल्यास रोगाची लागण होते. 
  • मात्र तापमान ३० सें.ग्रे. पर्यंत गेल्यावर रोगाचा प्रादुर्भाव खूपच झपाट्याने वाढतो. 
  • काळा तांबेराच्या वाढीसाठी नारंगी तांबेरा पेक्षा साधारण ५.५ सें.ग्रे. जादा तापमानाची गरज असते. 
  • पानावर रोगाची लागण होताच अंडाकृती ते लंब वर्तुळाकार आकाराचे हरीतद्रव्य नष्ट झालेले लहान ठिपके दिसून येतात. 
  • कालांतराने त्या ठिकाणी बुरशीच्या विटकरी रंगाच्या बीजाणूची पावडर दिसून येते ज्यामध्ये बुरशीचे असंख्य बीजाणू असतात. 
  • रोगाचा प्रादुर्भाव वाढून काळा तांबेरा पुढील काळात ओंबीवर तसेच कुसाळावर देखील दिसायला लागतो. 
  • अनुकूल हवामानात पिकाच्या बाल्यावस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. 
  • गव्हाच्या दाण्यांना सुरकुत्या पडून त्याच्या झिऱ्या होतात व १०० टक्केपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. 

 

तांबेरा रोगाचे व्यवस्थापन : 

  1. तांबेरा रोगास प्रतिकारक्षम गहू वाणांची पेरणी केलेली असल्यास पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. 
  2. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथून प्रसारित झालेले फुले समाधान, फुले सात्विक, नेत्रावती, एन.आय.डी.डब्लू. ११४९, फुले अनुपम, फुले अनुराग हे तांबेरा रोगास प्रतिकारक्षम वाण आहेत.
  3. शिफारसीनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 
  4. गव्हाला जास्त पाणी दिल्यास पिकात सतत ओलावा टिकून राहतो व आद्रतेमुळे रोगाचे प्रमाण वाढते.
  5. युरिया खताचा वापर शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात केल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
  6. तांबेरा रोगास बळी पडणाऱ्या वाणांवर तांबेरा रोगाची लागण दिसून येताच मॅन्कोझेब किंवा झायनेब या बुरशीनाशकांची २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 
  7. प्रादुर्भाव जास्त असल्यास टेब्युकोनॅझोल ५० % + ट्रायफ्लोक्झीस्ट्रोबीन २५ % डब्ल्यु.जी. या संयुक्त बुरशीनाशकाची १ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 
  8. जरुरी भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने करावी.  

 

- डॉ. भानुदास गमे, डॉ. योगेश पाटील कृषि संशोधन केंद्र, निफाड 

टॅग्स :गहूशेती क्षेत्रपीक व्यवस्थापनशेती