Grape Crop Management : द्राक्ष बागेत वेगवेगळ्या जाडीच्या (Grape Crops) काड्या उपलब्ध असतात. यामध्ये सरळ काडी व सबकेन दोन्ही आढळून येतात. त्यामुळे फळछाटणी करण्यापूर्वी आपल्या बागेतील सूक्ष्मघड निर्मिती काडीच्या नेमक्या कोणत्या डोळ्यात आहे, हे पडताळून पाहणे गरजेचे असते. यासाठी डोळे तपासणी महत्त्वाची ठरते. या लेखातून जाणून घेऊयात....
द्राक्षबागेत सध्या काडी तयार करण्याचे काम सुरु आहे. अशा स्थितीत काडीवरील डोळे तपासल्यामुळे बागेत नेमक्या कोणत्या प्रकारच्या काडीवर, नेमक्या कोणत्या जागी चांगल्या प्रकारचा घड आहे, हे जाणून घेता येते. यामुळे छाटणीमधील चुका टाळता येतात. यासाठी एक एकर बागेतील पाच ते सहा जागेवरून वेगवेगळ्या जाडीच्या पाच ते सहा काड्या प्रत्येकी एका डोळ्यावर कापून ओल्या गोणपाटामध्ये गुंडाळून प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाखाली तपासण्यासाठी पाठवाव्यात. जिथे सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी आपला पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन या वर्षोंही छाटणीचे नियोजन करावे.
अशी एकंदर प्रक्रिया....
दरम्यान फळछाटणीच्या एक ते दोन दिवस आधी बागेत प्रत्येक जाडीच्या (६ ते ८, ८ ते १० व १० ते १२ मि.मी.) सबकेन व सरळ काड्या गोळा कराव्या. प्रत्येक जाडीच्या पाच ते सहा काड्या तळातील एक डोळा राखून काढाव्या. या काड्या ओल्या गोणपाटात गुंडाळून प्रयोगशाळेत पाठवाव्या. डोळ्यातील सूक्ष्मघड निर्मितीची पडताळणी करून घ्यावी. सूक्ष्मघड निर्मितीची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी आपल्या मागील अनुभव ध्यानात घ्यावा. उदा. सरळ काडी असलेल्या बागेत साधारणतः ६, ७ आणि ८ या डोळ्यांतील पेऱ्याचे अंतर कमी झालेले दिसून येईल.
तर सूक्ष्मघड निर्मितीची खात्री....
या ठिकाणी सूक्ष्मघड निर्मिती चांगली असते. तेव्हा फळछाटणी घेतेवेळी हे डोळे राखून छाटणी घ्यावी. सबकेन केलेल्या बागेत सबकेनच्या शेजारी गाठ गाठ तयार झालेली असेल. डोळा जाड दिसेल. या डोळ्याला 'टायगर बड' असेही म्हणतात. फलधारणेच्या अनुषंगाने विचार करता हा डोळा महत्त्वाचा आहे. या गाठेच्या शेजारी निघालेली बगलफूट म्हणजेच सिंगल सबकेन होय. या फुटीवर सुरुवातीस दोन पेरे एकदम निमुळते दिसून येतील. हे पेरे राखून छाटणी घेतल्यास सूक्ष्मघड निर्मितीची खात्री मिळते.
संकलन : ग्रामिण कृषि मौसम सेवा, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक.