Grape Grafting : नाशिक जिल्ह्यात (Nashik District) मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती केली जाते. सद्यस्थितीचा काळ हा द्राक्षवेलीची कलम करण्याचा कालावधी आहे. नव्याने द्राक्ष लागवड करावयाची असल्यास दोन पद्धतीने केली जाते. पहिली पद्धत म्हणजे जमिनीत खुंटाची लागवड करून, नंतर त्यावर आवश्यक त्या जातीचे कलम करणे. दुसरी पद्धत अशी की तयार असलेल्या कलमरोपांची लागवड करणे. सध्या कलम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत माहिती घेऊया....
प्रत्यक्ष कलम करणे
कलम करतेवेळी बागेतील तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस आणि ८० ते ९० टक्के आर्द्रता असे वातावरण गरजेचे असेल. या सोबत खुंटकाडी ही रसरशीत असणे व पाचर कलम करतेवेळी कलमजोड हा प्लॅस्टिकची पट्टीने व्यवस्थित बांधून घेणे गरजेचे असते. बऱ्याच ठिकाणी कलम करण्याच्या कालावधीत पावसाला खंड पडलेला असतो. अशा स्थितीत सायन काडीमध्ये रसनिर्मिती कमी होते.
अशा परिस्थितीतील असलेल्या बागेत कलम करण्याच्या आधी तीन ते चार दिवस भरपूर पाणी द्यावे. त्याचा फायदा काडीमध्ये रसनिर्मितीला होतो. कलम केल्यानंतर बागेत उन्हे जास्त असल्यास सायन काडीच्या टोकावर मेण लावून घ्यावे. कलम केल्यानंतर साधारणतः १५ ते ५ ते १६ दिवसांत सायनकाडीवरील डोळ्या फुटण्यास सुरुवात होते. त्यापूर्वी खुंटकाडीवरील सकर्स भरपूर प्रमाणात दिसून येतील.
वेळीच सकर्स काढून घ्यावेत. अन्यथा, डोळे फुटणार नाहीत. लवकर फुटण्यासाठी बागायतदार हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग करतात. यामुळे काडी लवकर फुटून काही दिवसांतच ती फूट जळण्यास सुरुवात होते. परिणामी, कलम यशस्वी होणार नाही. त्यासाठी हायड्रोजन सायनामाइडचा वापर या बागेत टाळावा. त्यापेक्षा डोळा फुगलेल्या अवस्थेत जमिनीतून नत्राचा वापर फायद्याचा ठरेल.
संकलन : विभागीय संशोधन केंद्र आणि ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्र इगतपुरी