Harbhara Crop Management : हरभरा (Harbhara Farming) हे पीक व्यवस्थापनास अतिशय उत्तम प्रतिसाद देणारे पीक आहे. तसेच रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या विविध पिकांच्या तुलनेत हरभरा हे पीक सर्वात जास्त आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे असे पीक आहे.
हरभरा पिकासाठी (Gram Crop Management) विशिष्ट अवस्थेत योग्य हवामान मिळण्यासाठी हरभरा पिकाची पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान करावी. पिकास जास्त प्रमाणात पाणी दिले गेले अथवा पीक उभे असताना जास्त प्रमाणात दीर्घ कालावधीसाठी जमिनीत ओलावा राहिला तर मोठ्या प्रमाणात मर होते. हे टाळण्यासाठी हरभरा पिकाची लागवड सरी-वरंबा पद्धतीवर करावी.
त्यासाठी शेतात सरसकट ३ फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. वरंब्याच्या दोन्ही बगलेस, ७ ते ८ सेंटीमीटर अंतरावर, वरंब्याच्या मध्यावर टोकण पद्धतीने हरभऱ्याची लागवड करावी. या पद्धतीने लागवड करताना मजुरीवर निश्चित खर्च होतो. परंतु प्रचलित हरभरा लागवड पद्धतीच्या तुलनेत ३० टक्के बियाणे कमी लागते.
हे लक्षात ठेवा..
- देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम/विक्रांत/विश्वराज हे मर रोग प्रतिकारक्षम वाण तसेच काबुली हरभऱ्याचे विराट, विहार, पिकेव्ही २/४, कृपा हे वाण लागवडीसाठी शिफारस केलेले आहेत.
- विजय जातीचे हेक्टरी ६५ ते ७० किलो तर विशाल, दिग्विजय, विराट, पिकेव्ही २/४, कृपा या जातीचे हेक्टरी १०० किलो बियाणे वापरावे. पेरणीचे अंतर ३०x१० सेंटीमीटर ठेवावे.
- पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेंडेंझिम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति किलो बियाणास २५ ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणामध्ये (१ लिटर पाण्यात १०० ग्रॅम गूळ मिसळून बनवलेले) चोळावे. तासभर बियाणे सावलीत सुकवून नंतर पेरणी करावी.
- हरभरा पिकाला प्रति हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाशची आवश्यकता असते. त्यासाठी हेक्टरी १२५ किलो डीएपी व ५० किलो म्यूरेट ॲाफ पोटॅश पेरणीच्या वेळी दुचाडी पाभरीने पेरुन द्यावे, विस्कटून टाकू नये.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ