Join us

Lashkari Ali : मका पिकावरील नवीन लष्करी अळीचे असे करा नियंत्रण, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 3:49 PM

Maize Crop : मका पिकावर (Maize Crop) नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्याअनुषंगाने....

Agriculture News : नाशिक जिल्ह्यात (Nashik District) सटाणा, मालेगाव, देवळा व कळवण तसेच इतर तालुक्यात मका पिकावर (Maize Crop) नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी मका पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनाचा (crop Management) वापर करुन मशागत, भौतिक, जैविक व रासायनिक पध्दतीची उपाययोजना करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

मका पिकावरील नवीन लष्करी अळीची एक पिढी उन्हाळ्यात 30 दिवसात पूर्ण होत असून हिवाळ्यात 60 दिवसाचा कालावधी आढळून आला आहे. एका वर्षात 3 ते 4 पिढ्या विविध वनस्पतीवर पुर्ण होऊ शकतात. पतंगांची संख्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत भरपूर प्रमाणात आढळते. या अळीची अंडी पुंजक्याने पानावर घातली जातात. एक मादी तिच्या जीवनकाळात सरासरी 1500 ते 2000 अंडी घालू शकते. 

तसेच पूर्ण वाढ झालेल्या अळीच्या तोंडावर पांढऱ्या रंगाचे उलट्या वाय आकाराचे चिन्ह दिसते. या अळी अंड्यातून बाहेर पडताच हिरवा पापुद्र खातात. त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे दिसतात. तसेच दुस-या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पानांना छिद्रे करतात, पानांच्या कडा खातात व कणसाला छिद्र करुन दाणेही खातात. त्याअनुषंगाने मका पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापनाचा वापर  करावा, असे पत्रकात सूचित करण्यात आले आहे. 

एकात्मिक व्यवस्थापनाच्या पद्धती - 

मशागत पध्दत : उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. पीक फेरपालट करावी. मका घेतलेल्या पिकात भुईमुग अथवा सूर्यफूल पीक घ्यावे. सापळा पीक म्हणून मक्याचे बाजूने नेपिअर गवताची लागवड करावी. मक्यात तूर, उडीद तसेच मुग या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करावी.

भौतिक पध्दत : मका पेरणी नंतर एकरी १० ते १२ पक्षी थांबे उभारावेत. मका पानांवरील अंडीपुंज व नवजात अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. कीड सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे लवावेत. तसेच मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी एकरी ८ ते १० कामगंध सापळे लावावेत. 

जैविक पध्दत : मका पिकात १५०० पी.पी.एम. अॅझाडीरॅक्टीन ५० मिली किंवा १०००० पी.पी.एम. १० मि.ली. प्रति १० ली. पाणी या प्रमाणात सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत फवारावे. प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक कीटकनाशक मेटारायझियम (नोमुरिया) रीलेई किंवा मेटारायझियम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून सकाळी लवकर अथवा सायंकाळी ४ वा. नंतर फवारणी करावी. ट्रायकोग्रामा बॅक्टरी (ट्रायको कार्ड) १.५ लाख अंडी हेक्टरी सोडावेत.

रासायनिक पध्दत : थायमेथोझ्याम १२.६ % सी. जी. + लॅबडा सायहॅलोथ्रीन ९.५ % झेड. सी. २.५ मि.ली. किंवा स्पिनोटोरॅम ११.७% एस.सी. ५ मि.ली. किंवा क्लोरोनट्रॅनीलप्रोल १८.५% एस.सी. ४ मि.ली. या कीटकनाशकांची आलटून पालटून गरजेप्रमाणे १५ दिवसाचे अंतराने फवारणी करावी.

संकलन : कृषी विभाग, नाशिक 

टॅग्स :मकापीक व्यवस्थापनशेती क्षेत्रनाशिक