भातहे महत्वाचे (Paddy Crop) अन्नधान्य पीक म्हणून ओळखले जाते. विविध कारणाने भात उत्पादनात (Rice Production) मोठी घट येते. भात पिकाचे सरासरी हेक्टरी उत्पादन कमी येण्याची काही कारणे आहेत. त्या समस्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे भात पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे? याबाबत इगतपुरी (Igatpuri) येथील विभागीय संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी सविस्तर माहिती दिली आहे.
राज्यातील भात उत्पादनातील समस्या१. सुधारित व अधिक उत्पादन देणाऱ्या भात जातींचा अभाव२. असंतुलित सेंद्रिय/रासायनिक खतांचा वापर.३. रोग/किड व तण नियंत्रण उपायांचा अल्प वापर.४. अनियमित व अपुरा पाऊस, सिंचनाच्या अपुऱ्या सोई.५. खरीप हंगामात मिळणारा अपुरा सुर्यप्रकाश.६. रोप लावणीस लागणारा अधिक कालावधी/अपुरे शेतमजुर.७. यांत्रिकीकरणाचा अभाव.८. समुद्र किनाऱ्यालगतची खारवट जमिन.९. जमिनीतील लोहाची कमतरता (मराठवाडा).१०. कृषि निविष्ठांचा अवेळी व अपुरा पुरवठा उदा. बियाणे, खते, किटकनाशके.११. सुधारीत लागवड तंत्राज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यंत अल्प प्रसार.१२. सुधारीत भात गिरण्यांचा अभाव.
सुधारीत भात जातींची वौशिष्टे१. कमी उंचीच्या, न लोळणाऱ्या व नत्र खतास उत्तम प्रतिसाद देतात.२. पाने जाड, रुंद व उभट आणि हिरव्या रंगाची असल्याने कर्ब ग्रहणाचे कार्य अधिक होते. पाने अधिक काळ हिरवी व कार्यक्षम राहून पळींजांचे प्रमाण कमी होते.३. तांदळाचा तुकडा कमी होतो. भरडाई प्रमाण अधिक असते. प्रथिनांचे प्रमाण जास्त राहते. तांदुळ पांढरा शुभ्र असतो.४. फुटवा चांगला येतो फुटवे कमी कालावधीत निसावतात- फुलोऱ्यातील अंतर कमी होते. दाणे शेतात झडत नाहित.५. सुर्यप्रकाशास असंवेदनशील-सुर्यप्रकाशाच्या कालावधीमधील फरकास- असंवेदनशील तापमान फरकास- विशेष संवेदनशील पक्व होण्यास एकाच हंगामात वेगवेगळ्या ठिकाणी कमी अधिक दिवस.६. अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर- पिकाची फाजील वाढ होत नाही- दाण्यांचे उत्पादन वाढते.७. रोग/किड यांना प्रतिकारक आहेत.
भात पिकाच्या उत्पादकता वाढविण्यासाठी उपाययोजनासुधारित व संकरीत जातींचा वापरपावसाचा कालावधी, पाण्याची उपलब्धता, जमिनीची प्रत व जमिनीचा उंच सखलपणा यानुसार योग्य कालावधीच्या सुधारित व संकरीत जातीची निवड करावी.हळव्या जाती- राधानगरी-९९-१ (फुले राधा), फुले भागीरथी, रत्नागिरी-७११ राधानगरी-१८५-२, रत्नागिरी-७३, रत्ना, कर्जत- १८४ .निमगरव्या जाती- फुले मावळ, पालघर-१, कुंडलिका, जया, कर्जत- ५.गरव्या - कर्जत-२, कर्जत- ६, रत्नागिरी-२, मसूरी, सुवर्णा.सुवासिक व बासमती जाती- भोगावती, इंद्रायणी, पवना, आंबेमोहर-१५७, पुसा बासमती, बासमती-३७०संकरित जाती- सह्याद्री, सह्याद्री-३, सह्याद्री-४, प्रोअॅग्रो-६२०१, प्रोअॅग्रो-६४४४
पुनर्लागवड पध्दतीमध्ये उत्पादन कमी येण्याच्या कारणामध्ये रोपवाटिका व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष हे अत्यंत महत्वाचे कारण आहे. त्यामुळे योग्य रोपवाटिका व्यवस्थापन हे फायदेशीर भात शेतीचे मूळ कारण आहे. भात पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी चारसूत्री भात लागवड तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. हे तंत्र सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम, एकूण लागवडीतील बी, मजूर व खत यांचा खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदुषण टाळणारे व भातशेती फायदेशीर करणारे आहे.चारसुत्रांपैकी पहिले सूत्र रोपवाटिकेसाठी वापरावे जसे भाताच्या तुसाची काळसर राख रोपवाटिकेत बी पेरण्यापुर्वी गादी वाफ्यात मिसळावी. खात्रीशिर व भेसळविरहीत बियाण्यांचा वापर करावा.पुर्वमशागत : भात पिकाच्या योग्य वाढीसाठी शेताची योग्य प्रकारे पुर्वमशागत करणे अत्यंत महत्वाचे असते. पुर्वमशागतीमुळे जमिनीच्या विविध थरांची उलथापालथ होते आणि काही प्रमाणात तण, कीड व रोगांचेही नियंत्रण होते.सेंद्रिय खतांचा वापर : नांगरणीच्या वेळी हेक्टरी १० मे.टन शेणखत अथवा कंपोस्ट खत मातीमध्ये पूर्णपणे मिसळून द्यावे.
भात वाण निवड
नाव | वैशिष्ट्ये | उत्पादन (क्विं/हे) | |
धान्य | पेंढा | ||
इंद्रायणी | लांब, पातळ, सुवासिक दाण्यांची निमगरवी जात. करपा व पर्णकरपा रोगास मध्यम प्रतिकारक | ४०-४५ | ४४-४८
|
फुले समृध्दी | लांब पातळ दाण्यांची निमगरवी जात. करपा, कडा करपा व खोड किडीस मध्यम प्रतिकारक | ४५-५०
| ४९-५३ |
भोगावती | लांब, पातळ, सुवासिक दाण्यांची निमगरवी जात. करपा व पर्णकरपा रोगास मध्यम प्रतिकारक | ४०-४५ | ५०-५५ |
फुले राधा | मध्यम-बारीक, हळवा, करपा व कडा करपा रोगास मध्यम प्रतिकारक | ३५-४० | ४२-४५ |
रोपवाटिका नियोजनसुधारीत जाती
पध्दत | बियाणे किलो प्रति हेक्टरी |
पुनर्लागवड | ३५-४० |
पेरणी | ७५ |
टोकण (१५-२५ x १५-२५ सें.मी.) | २५-३० |
ब) संकरीत जातींसाठी प्रति हेक्टरी 20 किलो बियाणे वापरावेबिजप्रक्रिया पेरणीपूर्वी बियाणास ४ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे कॅप्टाफॉल (७५ डब्लु.पी.) बुरशीनाशक चोळावे. त्यानंतर अॅझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जीवाणू व अॅझोस्पिरीलिअम या जीवाणू खतांची २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
गादीवाफ्यावरील पेरणी कालावधी व पेरणी अंतर
भाताची बियाणे पेरणी करताना गादी वाफ्याचा उपयोग करण्यात यावा. त्यासाठी १ मीटर रुंदी, १५ सें.मी. उंची व सोईनुसार लांबी ठेवून गादी वाफ्यावर खरीप हंगामामध्ये १ जून ते ३० जून पर्यंत पेरणी करावी.साधारणत: १० गुंठ्याची रोपवाटीका १ हेक्टर लागवडीसाठी पुरेशी ठरते. रोपवाटीकेसाठी २५० ग्रॅम शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फुरद, ५०० ग्रॅम पालाश प्रति गुंठा द्यावे. पेरणी ओळीत करावी. पेरणीनंतर १५ दिवसांनी ५०० ग्रॅम नत्र प्रति गुंठा रोपे वाढीसाठी द्यावे.रोपवाटिकेसाठी बियाण्याची पेरणी पुरेशा ओलाव्यावरच गादीवाफ्यावर करावी; कोरड्या जमिनीत भात बियाण्याची पेरणी करु नये.गादीवाफ्यावर पेरणी ओळीत व विरळ करावीपावसाच्या अभावी व इतर कारणाने लागवड लांबणीवर पडल्यास प्रति गुंठा क्षेत्रातील रोपास १ किलो युरियाचा तिसरा हफ्ता द्यावा.योग्य पाणी व्यवस्थापन करावे.किड, रोग व तणनियंत्रणाकडे लक्ष द्यावे.
तण नियंत्रणरोपवाटिकेतील तण नियंत्रणासाठी १५ मि.ली. ऑक्झीफ्लुरोफेन २३.५ टक्के ई.सी. प्रती १० लिटर पाण्यात पेरणीनंतर दोन ते तीन दिवसात फवारावे अथवा ब्युटाक्लोर ५० ई.सी. १.५ किलो क्रियाशील घटक प्रती हेक्टरी अथवा अॅनिलोगोर्ड ३० ई.सी. ३ किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टरी फवारण्यात यावे.
पीक संरक्षण रोपवाटिकेत वाफ्यात बियाणे टाकतेवेळी किंवा पेरणीनंतर १५ दिवसांनी दाणेदार क्लोरोपायरीफॉस १० टक्के (१० कि.ग्रॅ.) किंवा क्विनालफॉस ५ टक्के (१५ कि.ग्रॅ.) प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीत मिसळावे.रोपवाटिकेतील वाफ्यात खोडकिडीचे कामगंध सापळे प्रति हेक्टरी पाच या प्रमाणात लावावेत.रोपवाटिकेत तुडतुडे, खोडकिडी, गादमाशी यांचे प्रादुर्भावानूसार ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.खेकड्यांच्या बिळाशेजारी विषारी आमिष ठेवून्न खेकड्यांचे नियंत्रण करता येते यासाठी एसिफेट ७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी (७५ ग्रॅम) घेऊन १ कि.ग्रॅ. शिजवलेल्या भातामध्ये मिसळावे. या अमिषाचे १० लहान-लहान गोळे करुन खेकड्यांच्या बिळात टाकावे.
संकलन : प्रा. सुरेश परदेशी, डॉ. दीपक डामसे, डॉ. जयपाल चौरे, डॉ. हेमंत पाटील
(विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी)