गहूकाढणीला सुरवात झाली असून गहू कापणीपासून ते मळणीपर्यंत आणि गव्हाच्या साठवणुकीपर्यंत काळजी घेणे महत्वाचे असते. गव्हाची कापणी कशी, करावी, मळणी कशी करावी आणि मळणीनंतर साठवणूकीसाठी काय काळजी घ्यावी याबाबत सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ. कल्याण देवळाणकर यांनी कृषी सल्ला दिला आहे.
गव्हाच्या वाढीच्या काळात यावर्षी महाराष्ट्रात पाहिजे तसा थंडीचा कडाका जाणवला नाही. त्यामुळे गव्हाचे पीक वेळेअगोदरच पक्व होण्याची शक्यता आहे. पीक पक्व होण्याच्या दोन-तीन दिवस अगोदरच कापणी करावी, नसता गव्हाच्या काही वाणाचे दाणे शेतात झडू शकतात. कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण साधारणपणे १५ टक्क्यांपर्यंत असावे. गव्हाची मळणी शेतकरी बहूदा मळणी यंत्राने करतात. मात्र अलिकडे कापणी, मळणी, उफणणी तसेच पोत्यात गहू भरणे, या सगळ्या बाबी एकाच यंत्राने होत असल्याने शेतकरी बांधवांचा कल कबांईन हार्वेस्टरने गहू काढण्याकडे वाढला आहे. गहू अधिक काळ चांगल्या स्थितीत राहण्यासाठी गव्हाची व्यवस्थित साठवण करणे गरजेचे असते. गहू साठवणूकीसाठी ओलावा, उंदीर, पक्षी आणि घाणीपासून मुक्त अशा सुरक्षित जागेची निवड करावी. गहू साठवणूकीसाठी धातुच्या पत्र्यापासून अथवा सिमेंटपासून बनविलेल्या सुधारित कोठयांचा वापर केल्याने किड, उंदीर किंवा ओलाव्याचा प्रादुर्भाव होत नाही. पोत्यात गव्हाची साठवणूक करताना पोती स्वच्छ साफ करुनच त्यात धान्य भरावे. धान्य भरलेली पोती लाकडी फळ्या अथवा पॅालिथिनच्या चादरीवर ठेवावीत. असे केल्याने गव्हाची जमिनीतील ओलाव्यामुळे जी नासाडी होते ती होत नाही. बाजारात पॅालिथिनच्या पिशव्या मिळतात, अशा पिशव्या पोत्यात घालुन नंतर त्यात धान्य भरले तर धान्य अधिक काळ सुरक्षित राहते.
साठवलेल्या गव्हातील किडींच्या नियंत्रणासाठी
२० मि.लि. मॅलॅथिॲान (५०% प्रवाही) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच ३० ग्रॅम प्रति क्विंटल या प्रमाणात सेल्फ़ॅास भुकटीचा बंद कोठारात वापर करावा. साठवलेल्या गव्हाची उंदीर मोठ्या प्रमाणात नासधूस करतात. ते टाळण्यासाठी विषारी अमिषाचा प्रत्यक्षात वापर करण्यापुर्वी दोन ते तीन दिवस भरडलेल्या धान्यात थोडेसे गोडेतेल मिसळून उंदरांना आकर्षित करावे. नंतर एक भाग झिंक फॅास्फाईड + ५० भाग भरडलेले धान्य + पुरेसे गोडेतेल हे मिश्रण असलेल्या अमिषाचा वापर करुन उंदरांचा बंदोबस्त करावा. साठवलेल्या गव्हाचा पुढील हंगामात बियाणे म्हणून वापर करायचा असल्यास साठवणूकी दरम्यान प्रत्येक पोत्यात काही प्रमाणात वेखंड पावडर मिसळावी.
लेखक : डॉ. कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .