अमरावती : अनेक भागांतील संत्रा, मोसंबीवर (Orange, Mosambi) कोळी / लाल्या (माइट) व फायटोप्थोराचा अटॅक झालेला आहे. या बुरशीजन्य रोगामुळे मूळकूज, बुडकूज, डिंक्या व पानझड होत असल्याने संत्रा उत्पादकांची चिंता वाढली आहे. आधीच संत्र्याला भाव नाही, त्यातच फळगळ होत आहे व अशातच कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विदर्भाच्या (Vidarbha) कॅलिफोर्नियामधील संत्रा धोक्यात आला आहे.
रोगाची लक्षणेः
फायटोफ्थोरामुळे (Phytophthora) होणाऱ्या डिंक्या रोगात सुरुवातीला झाडाच्या लहान भेगांमधून डिंक पाझरतो, पावसामुळे डिंकाचा स्त्राव धुतल्या जातो त्यानंतर झाडाची साल आधी टणक होते व नंतर वाळते. रोगग्रस्त झाडात निरोगी झाडाच्या तुलनेत कमी तंतूमुळे राहतात त्यामुळे पोषकतत्वांचा पुरवठा मर्यादित होतो व झाडांची पाने पिवळसर पडायला सुरुवात होते. जास्त प्रमाणात संक्रमण झाल्यास झाडाच्या बुडाल सुद्धा ईजा होते व अपुऱ्या अन्नाअभावी संपूर्ण झाडाच वाळते. ओलाव्याच्या अभावामुळे (कोरडे झाल्यामुळे) अनियमित किंवा कमी अधिक फळधारणा होऊन कालांतराने झाड मरण पावतो.
रोगाचा हंगामः
ही बुरशी वर्षातील कोणत्याही वेळेस दिसुन येते. परंतु डिंक्या रोगाची लक्षणे मात्र ऑक्टोंबर व डिसेंबर या काळात ठळकपणे दिसून येतात.
व्यवस्थापन : प्रतिबंधात्मक उपाय
फळबागांमध्ये अतिशय प्रभावी पाण्याचा निचरा व सिंचन करणे.
शेतकामाच्या वेळी झाडाच्या खोडाला अथवा तंतूमुळांना इजा होऊ नये याची काळजी घ्यावी.
डोळे बांधणी (बडींग) शक्यतो जमिनीपासुन कमीत कमी ९ इंच उंचीवर करावी.
रोग प्रतिरोधक प्रमाणीत खुंटावर (अलिमो) तयार केलेली कलमे लावावी.
मातीचे सौर निर्जंतुकीकरण उन्हाळ्यात करावे किंवा डॅझोमेट या बुरशीनाशकाचा वापर करून मातीचे निर्जंतुकीकरण करावे.
वर्षातून दोनदा पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर झाडांच्या बुथ्यावर बोर्डोपेस्ट लावावी. (१ किलो मोरचूद (कॉपर सल्फेट CuSo4): १ किलो चूनाः १० लिटर पाणी)
बोर्डोपेस्ट तयार करण्याकरीता १ किलो मोरचूद (कॉपर सल्फेट) ५ लिटर पाणी तसेच १ किलो कळीचा चुना ५ लिटर पाणी आणि प्लास्टीकच्या बादलीमध्ये किंवा मडक्यात घेऊन वेगवेगळे भिजत घालावे. भिजत घातलेले चुना व मोरचूद दुसऱ्या दिवशी तिसन्य बादलीमध्ये किंवा मडक्यात मोरचूदचे द्रावण हळूहळू टाकावे व सतत ढवळावे. तयार झालेली पेस्ट ही १० टक्के तिव्रतेची पेस्ट होईल. बोर्डोपेस्ट ब्रश च्या सहाय्याने झाडाच्या खोडावर जमिनीपासून ६०-९० सेमी पर्यंत लावावे.
डिंक्याग्रस्त झाडाची खोडावरिल रोगग्रसित साल झाडाला इजा न करता चाकुँने खरडून त्यावर मेफेना क्झाम एम. झेड. ६८ आणि कार्बेडेंझीम (६० ग्राम : २० ग्राम / लिटर) ची पेस्ट लावावी.
अशा झाडावर फवारणी व ट्रेंचिंग करण्यासाठी मेफेनॉक्झाम एम. झेड. ६८ (२.५० ग्राम/ लिटर) ८-१० लिटर पाणी प्रती झाड किंवा फोसेटिल एल (२.५० ग्राम/ लिटर) दोनदा ऑगस्ट व ऑक्टोबर मध्ये ४० दिवसांच्या फरकाने फवारणी करावी.
जैविक नियंत्रण :
मध्य भारतातील हवामानात ट्रायकोडर्मा (NRCfBA-44) ही प्रतिरोधक बुरशी मुळकुजचे नियंत्रण करण्यासाठी वापरावी.
ट्रायकोडर्माचे प्रमाण :
संत्रा बागेतः १०० ग्राम ट्रयकोडर्मा पावडर + १ किलो उत्कृष्ट शेणखत प्रति झाड.
रोपवाटीकेत : २० ग्राम ट्रयकोडर्मा पावडर प्रति पा०लिबॅग (२ लिटर क्षमता असलेली)
वापरण्याची वेळः वर्षातून दोनदा या उत्पादनाचा वापर करावा.
पहिली मान्सूनच्या सुरुवातीला (जून जुलै) आणि दुसरी मान्सूननंतर (सप्टेंबर ऑक्टोबर) पाऊस जास्त पडल्यास ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या महिन्या मध्ये वरील बुरशीनाशकाची पुन्हा फवारणी करावी.
आय. सी. ए. आर. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्थान, नागपूर चे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी विदर्भातील संत्रा उत्पादकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून रोगाचा गंभीर धोका असल्यास उत्पादकांना संक्रमित फळबागांमध्ये फासेटील अल्युमिनियम किंवा मेफेनोक्झाम एमझेड २.५ ग्राम / लिटर पाण्यात फवारणी करण्याचा सल्ला दिला. तसेच फळ तोडणी च्या वेळी संक्रमित फळे क्रेट / बाक्स मध्ये टाकल्या जाऊ नये याची खबरदारी घ्यावी तसे केल्यास प्रक्रिया किंवा पॅकेजिंगची सुविधा नाकारण्यात येऊ शकते.
संकलन : आय. सी. ए. आर. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्थान, नागपूर