Unhali Pike : यावर्षी महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला असल्याने, उन्हाळी हंगामात (Summer Season) पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने उन्हाळी पीक क्षेत्रात वाढ झालेली आहे. लागवड केलेल्या या उन्हाळी पिकांची मार्च महिन्याच्या अखेरीस विशेष काळजी घेतली तर निश्चितच चांगले उत्पादन मिळेल.
उन्हाळी पिकांचे मध्य हंगामी पीक व्यवस्थापन
वेळेत पेरणी झालेल्या उन्हाळी बाजरी (Unhal bajari Pik) पिकास पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी म्हणजेच फुटवे फुटण्याच्या अवस्थेत पाण्याची पाळी अवश्य द्यावी. त्यानंतर साधारणतः १० ते १२ दिवसाच्या अंतराने बाजरी पिकास पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पहिल्या पाण्याच्या अगोदर, पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी हेक्टरी १०० किलो युरिया खत द्यावे.
उन्हाळी भुईमूग पिकास पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी पहिली व त्यानंतर १० दिवसांनी दुसरी कोळपणी करावी. पेरणीनंतर ३० दिवसांनी १२५ किलो जिप्सम प्रति हेक्टरी द्यावा. पेरणीसाठी भुईमुगाचा उपट्या वाण वापरला असल्यास पिकास जास्त आ-या धरण्यासाठी पिकावर पेरणीनंतर ३० ते ४५ दिवसांदरम्यान किमान २ वेळा रिकामा ड्रम फिरवावा.
भुईमूग पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसू लागताच तज्ञाच्या शिफारशीप्रमाणे निंबोळीवर आधारित जैविक कीडनाशकाची फवारणी करावी. त्यानंतरची फवारणी क्विनॅालफॅास (२५% प्रवाही) १००० मि.ली. प्रति ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर क्षेत्रावर या किटकनाशकाची करावी.
उन्हाळी हंगामात घेतलेल्या सूर्यफूल पिकास पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ३५ किलो युरिया खत द्यावे. २ ते ३ वेळा डवरणी करावी. आवश्यकतेनुसार खुरपणी करून पीक ४५ दिवसांचे होईपर्यंत तणविरहित ठेवावे. जमिनीच्या मगदूराप्रमाणे योग्य अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ