यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने भागात पाणी टंचाईची समस्या ठाकली आहे. अशातच अनेक भागात पाणी टंचाईमुळे पिकांवर होत आहे. शिवाय उन्हाची दाहकता वाढत असल्याने पाणी पातळी घटत चालली आहे. त्यामुळे पिके जगवणे शेतकऱ्यांना मुश्किल झाले आहेत. अशा स्थितीत उन्हाळी पिकांसाठी पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ. कल्याण देवळाणकर यांनी काही उपाय सुचवले आहेत . उन्हाळी पीक उत्पादनात पाणी हा अतिशय महत्वाचा घटक आहे. पिकास पाणी देण्याच्या पध्दतीत ठराविक दिवसाच्या अंतराने पिकास पाणी देणे, बाष्पीभवन पात्रातून पाण्याचे होणारे विशिष्ट प्रमाणातील बाष्पीभवन लक्षात घेवून पिकास पाणी देणे आणि पिकांच्या संवेदनक्षम अवस्थेत पिकास पाणी देणे याचा समावेश होतो. उन्हाळी पिकांसाठी संवेदनक्षम अवस्थांनुसार पाणी दिल्यास दोन पाळयातील अंतर जास्त राहते आणि उन्हाळी हंगामात वातावरणाची पाण्याची गरज खूपच जास्त असल्याने जास्त अंतराने दिलेल्या पाण्याने पिकाची गरज भागत नाही, पर्यायाने त्याचा पीक उत्पादनावर विपरित परिणाम होतो. म्हणून उन्हाळी हंगामात घेतलेल्या पिकांना जमिनीच्या प्रकारानुसार ठराविक दिवसा च्या अंतराने पाणी देणे गरजेचे असते.
एकंदरीत उन्हाळी हंगामात घेतलेल्या (चारा पिकासहीत) पिकांना जमिनीच्या मगदुरानुसार सरसकट ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.१. उन्हाळी भुईमुगाची पाण्याची एकुण गरज सुमारे ७० ते ८० सें.मी. एवढी असते. ही गरज पिकास एकुण १२ ते १३ पाण्याच्या पाळया देवून भागवावी.२. मका व चा-यासाठी घेतलेल्या ज्वारी पिकाची पाण्याची गरज ४० ते ४५ सें.मी. एवढी असते. उन्हाळी हंगामात या पिकांना ६ ते ७ पाण्याच्या पाळया देवून ही गरज भागवावी.३. बाजरी पिकास उन्हाळी हंगामात ३० ते ३५ सें.मी. पाणी लागते त्यासाठी या पिकास ५ ते ६ पाण्याच्या पाळया उन्हाळी हंगामात द्याव्यात. ४. सुर्यफूल पिकाची उन्हाळी हंगामातील पाण्याची एकुण गरज जवळपास ४० सें.मी. एवढी असते. ही गरज भागवण्यासाठी उन्हाळी हंगामात सुर्यफूल पिकास ५ ते ६ पाण्याच्या पाळया दयाव्यात.
लेखक : डॉ. कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .