Join us

Intercropping Sesame in Banana : केळी पिकात तिळाची लागवड करा, असंख्य फायदे मिळवा, इथं वाचा सविस्तर 

By गोकुळ पवार | Updated: January 28, 2025 14:00 IST

Intercropping Sesame in Banana : आजचा बाजारभाव पाहिल्यास २०० रुपये किलोने भाव मिळाला तरी शेतकऱ्यास हेक्टरी ०२ लाख रुपये मिळतात आणि तेही ९० दिवसात.

Intercropping Sesame in Banana :  जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) यावल तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत तेलबिया संशोधन केंद्र जळगाव यांच्या संपर्कात असलेले एक प्रगतशील शेतकरी महेश भाऊ गाडे यांनी मागील तीन वर्षापासून हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. यंदाही या शेतकऱ्याने पाच एकर क्षेत्रावर केळीमध्ये तीळ पिकाची आंतरपीक (Keli Sheti) म्हणून लागवड केली आहे. शिवाय हे शेतकरी केळीच्या पिकात बटाट्याचे पीकही आंतरपीक (Intercropping Farming) म्हणून यशस्वीपणे घेत आले आहेत.

लागवडीचा कालावधी आणि नियोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारा (Mahatma Fule Krushi Vidyapith) नुकतीच तिळीची उन्हाळी हंगामासाठी फुले पूर्ण नावाची जात प्रसारित झालेली आहे. या जातीचा उपयोग उन्हाळी हंगामामध्ये लागवड करण्यासाठी करावा. मकर संक्रातीनंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून फेब्रुवारीच्या १५ तारखेपर्यंत तीळ पिकाची लागवड करू शकतो. उशिरा लागवड केल्यास हे पीक जून महिन्यातील पावसात सापडते, म्हणून पावसात सापडायला नको म्हणून योग्य कालावधी निवडणे गरजेचे असते. केळीचं पीक पाच बाय पाच फुटाच्या अंतरावर ठिबक संच पसरवून करण्यात येतो. याच ठिबक संचाच्या नळीपासून १५ सेंटीमीटर अंतरावर दोन्ही बाजूने तीळ पिकाची लागवड दोन रोपातील अंतर १० सेंटिमीटर ठेवून करावी. 

तीळ पिकास पक्वतेस ९० दिवस जास्तीत जास्त लागतात. या ९० दिवसांमध्ये तीळ पिकाची वाढ साधारण १२० सेंटीमीटरपर्यंत होत असते आणि तीळ पिकाचे पाने ही भाल्याच्या आकाराची किंवा भेंडीच्या आकाराची असल्याकारणाने त्या पिकाची सावली छान प्रकारे जमिनीवर पडत असते. या सावलीचा फायदा केळी पिकास उन्हापासून संरक्षणासाठी होत असतो. त्या ठिकाणी सूक्ष्म तापमान तयार होऊन उष्ण तापमानापासून केळीचं संरक्षण होण्यास मदत होते. पर्यायाने सीएमव्ही सारख्या रोगास प्रतिबंध तयार होतो.

तीळ पीक केळीसाठी संरक्षण कवच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीळ पिकाला कोणतेही जंगली जनावर खात नाही आणि त्यामुळे संपूर्ण क्षेत्राची राखण होते. तीळ पीक एक प्रकारचं संरक्षण कवच मुख्य पिकासाठी करीत असते. पिकास लागवडीपासून ते काढणीपर्यंत ९० दिवस लागतात आणि नेमकं या ९० दिवसात उन्हाळ्यामध्ये तापमान वाढलेल असते.  त्या तापमान वाढीचा परिणाम केळी पिकावर होत असतो. केळी पिकासाठी जे सेंद्रिय किंवा रासायनिक खत किंवा विद्राव्य खताची मात्रा देत असतो, त्याच खतांच्या मात्रावर तीळ पिक अतिशय उत्तमरीत्या येते.

म्हणून तीळ पिकाची निवड.. अनेक शेतकरी फेब्रुवारी महिन्यात केळी लागवडीकडे वळतात किंवा करीत असल्याचं निर्देशनास येत आहे. त्याला कारण असे की गेल्या पाच, सात वर्षांपासून फेब्रुवारीत लागवड केलेल्या केळीला बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे. परंतु Cucumber mosaic virus नावाचा  विषाणूजन्य रोग हा नेमका उन्हाळी लागवडीमध्ये जास्त प्रमाणावर होतो. हा रोग होण्यास कारणीभूत असलेले विषाणू हे जवळ-जवळ दोन हजार प्रकारच्या Host plants वर उपजत असतात आणि त्यांना पोषक हवामान ज्यावेळेस मिळते, त्यावेळेस झपाट्याने त्याची वाढ होते. नेमक्या या उन्हाळी लागवडीमध्ये तापमान वाढीचा परिणाम केळी पिकावर होत आलेला आहे. यासाठी केळीच्या दोन ओळींमध्ये आंतरपीक करीत आहेत. 

९० दिवसांत २ लाखांचे उत्पन्न उन्हाळी हंगामामध्ये तीळ पिकापासून हेक्‍टरी आठ ते दहा क्विंटलपर्यंत उत्पन्न सहज घेता येते. आजचा बाजारभाव पाहिल्यास २०० रुपये किलोने भाव मिळाला तरी शेतकऱ्यास हेक्टरी ०२ लाख रुपये मिळतात आणि तेही ९० दिवसात. तीळ पीक लागवड करताना बियाणास प्रक्रिया आणि कीटकनाशकाच्या दोन फवारण्या कराव्या लागतात. काढणीचा खर्चही अतिशय कमी आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी असे प्रयोग करण्यावर भर द्यावा. तिळीचे बियाणे तेलबिया संशोधन केंद्र जळगाव येथे उपलब्ध असून २२५ रुपये प्रति किलो दिले जात आहे. अधिक माहितीसाठी ९४०५१३८२६९ या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन तेलबिया संशोधन केंद्राकडून करण्यात आले आहे. 

केंद्र शासन या वर्षापासून तेलबिया पिकांसाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर तीळ पिकाला बाजारभाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.  कारण तेलबिया पिकामध्ये भारत हा मागे पडत चाललेला असून बाहेरच्या देशातून तेलबिया पिके आयात करावी लागत आहेत. देशाला तेलबिया पिकांमध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी शेतकरी राजालाच पुढे यावं लागणार आहे. अशा पद्धतीने विविध प्रयोग करून देशाला समृद्ध कराव लागेल. - प्रा. डॉ. सुमेरसिंग राजपूत, तीळ पैदासकार, तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव.

टॅग्स :केळीशेती क्षेत्रकृषी योजनाशेतीजळगाव