Jamin Kharedi : जमीन खरेदी-विक्री व्यवहार करताना (Jamin Kharedi) अनेक बाबी लक्षात ठेवणे आवश्यक ठरते. कालच्या भागात याबाबत माहिती घेतली आजच्या भागातून जाणून घेऊयात...
तर खरेदी करावयाच्या क्षेत्रात कोणाचा हक्क अधिकार आहे का? जसे की वंशपरंपरागत. त्यामुळे सदर जमिनीचे पूर्ण क्षेत्र विकण्याचा अधिकार सदर खरेदी देणार व्यक्तीस आहे का? याबाबतीत पडताळणी आवश्यक आहे. यानंतर आपण खरेदी घेत असलेल्या क्षेत्राचा ताबा खरेदी देणार याच्याकडेच आहे का? याबाबतीत समक्ष स्वतः खरेदी करावयाच्या क्षेत्रात जाऊन पाहणी करावी,
खरेदी क्षेत्राचा ताबा घेतेवेळी....
खरेदी क्षेत्राचा ताबा घेतेवेळी अथवा खरेदी क्षेत्र पाहतेवेळी सदर क्षेत्र जेवढे उताऱ्यावर नमूद आहे, तेवढे भरते का? याबाबत समक्ष कच्चे मोजमाप करावे तसेच मा. तलाठी कार्यालयातून सदर गटाच्या चतुरसीमा व खरेदी करावयाचे क्षेत्र याच्या चतुरसीमा तपासून घ्याव्या. खरेदी क्षेत्रावर असलेले पीक व त्याचा लाभ खरेदी देणारा व्यक्ती घेतोय की नाही, याची तपासणी झाली पाहिजे. कारण मूळ हक्कात नाव एकाचे व ताबा दुसऱ्याचा असे प्रकार वारंवार निदर्शनास येतात.
खरेदी घेण्यापूर्वी कायदेशीर बाबींची पूर्तता
खरेदी घेण्यापूर्वी कायदेशीर बाबींची कागदोपत्री पूर्तता करावयाचे झाल्यास त्यामध्ये आपण समक्ष फेरफार तपासणी, पेपरला जाहीर नोटीस, सर्च रिपोर्ट वगैरे गोष्टी केल्या पाहिजेत. ज्याचा जास्त प्रचार व माहिती समाजात रुजवली गेलेली नाही. खरेदी घेत असताना सामान्य व्यक्ती सहसा सरकारी व्हॅल्युएशन नुसार खरेदीचा व्यवहार कागदपत्रावर दाखवतात. त्यानुसार स्टॅम्प ड्युटी भरली जाते. मात्र वास्तवात सदर व्यवहार हा सरकारी व्हॅल्युएशन पेक्षा जास्त रकमेने झालेला असतो. अशावेळी देणारा आणि घेणारा या दोघांनाही उर्वरित रकमेचा काही एक व्यवहार दाखवता येत नाही.
व्यवहार कागदावर घ्या....
यासाठी सामान्य पद्धतीने खरेदी संदर्भातील इतर व्यवहार देवाणघेवाण संदर्भात नोटरीचा कागद शेतकरी बांधवांनी करावा. ज्यामुळे खरेदी विक्रीचा संपूर्ण व्यवहार कायदेशीर कागदोपत्री सुरक्षित राहील. या कारणामुळे उद्भवणारे वाद विवाद निर्माण होणार नाही. बऱ्याच वेळेस शेतकरी "भावनिक आधारावर" खरेदी विक्रीचा शासकीय मूल्यांकन वगळता झालेला व्यवहार एकमेकांवरील विश्वासामुळे कागदावर मांडत नाही, परंतु खरेदी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुढे येणाऱ्या पिढींना झालेले व्यवहार मान्यच होतील, असे नाही वा काळ बदलत गेला की मनही बदलतात आणि कागदपत्रे नसलेल्या व्यवहारावरून वाद विवाद पाहाव्यास मिळतात.
सुज्ञ नागरिक बनून खरेदी करावी...
खरेदी वेळी दुय्यम निबंध कार्यालयात असलेल्या रजिस्टरला सदर खरेदी मिळकतीबाबत स्टे ऑर्डर आहे का? हे तपासावे. तसेच तयार करण्यात आलेल्या खरेदी दस्तानुसार सर्व पूर्तता झाली आहे का? याची शहानिशा करावी खरेदी खतात भरपूर काही उल्लेख असतात, जसे प्रत्यक्ष ताबा दिला, पैसे मिळाले, कर्ज नाही, जोड जोखमीत गुंतवली नाही, इतर कोणाचा हकक नाही, वगैरे पण वास्तवात खरेदी देणार-घेणार तसे वागत नाहीत. त्यावरून अनेक प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे दिसून येते. खरेदी विक्रीमध्ये विश्वास महत्त्वाचा असतो आणि तो विश्वास "कागदोपत्री पूर्णत्वास नेला" तरच खरा व्यवहार असतो. त्या विश्वासाला कायद्याने दिलेला विश्वास आपण संबोधू शकतो. त्यामुळे खरेदी करताना सुज्ञ नागरिक बनून खरेदी करावी.
- अॅडव्होकेट मयूर कारभारी वाखुरे, जिल्हा व सत्र न्यायालय, नेवासा, अहिल्यानगर