Jamin Kharedi : आज समाजात वावरत असताना वाढत असलेली लोकसंख्या व त्यानुसार येणाऱ्या विविध अडचणींपैकी एक आहे, ती म्हणजे 'जमीन'. वास्तविक जमीन अडचणीची नसून जमिनीवर वास्तव करणाऱ्या माणसाला वाढत्या लोकसंख्येमुळे जमीन कमी पडू लागली आहे. परिणामी जमिनीचे भाव गगनाला भिडले असून जमिनीची खरेदी विक्रीचे (Jamin Kharedi Vikri) प्रमाण वाढले आहे.
जमीन खरेदी-विक्रीमध्ये (Land Buying selling) मोठ्या प्रमाणात अनियमितता जाणवत असून जमिनीची खरेदी -करणाऱ्या एजंटचा सुळसुळाट सर्वत्र पाहायला मिळत आहे. एजंटचे शिक्षण किती? त्याला किती ज्ञान याचा काही एक विचार न करता कायदेशीर बाबींची पूर्णतः पडताळणी न करता वर-वर उतारे पाहून खरेदी विक्रीचे प्रमाण वाढले आहे.
शासनाने वेळोवेळी जमीन धारणा संदर्भात जमिनीचे विविध वर्ग यासंदर्भात नियमावली केल्याचे आपण पाहतो. खास करून वर्ग १ व वर्ग २ च्या जमिनीचे खरेदीखत मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. वर्ग १ जमिनीची खरेदीखत सुरक्षित मानले जाते. पण वर्ग १ च्या जमिनीची खरेदीखत करत असताना देखील अनेक प्रकारची माहिती आपणास हवी. त्या सर्व प्रकारची माहितीची खात्री करूनच खरेदी करावी, असे या निमित्ताने सांगणे राहील.
जमिनीचे मूळ मालक शासन
मुळात जमिनीचे मूळ मालक शासन असते. आपण फक्त मालमत्ता धारक व शासनाच्या ७/१२ वर मूळ हक्कात मालक असतो. शेतजमिनी संदर्भात विचार करावयाचा झाल्यास सातबाराचा पूर्ण अभ्यासासाठी एक वेगळा लेख घ्यावा लागेल. परंतु तूर्तास खरेदीचे अनुषंगाने महत्त्वाचा असतो. तो ७/१२ व या सातबारा वरील काही प्रमुख घटकांची आपण तपासणी केलीच पाहिजे....
फेरफार काय सांगत असतो..
त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे 'फेरफार'... फेरफार हा सांगत असतो की, आपल्या उताऱ्यावर काय- काय फेरबदल झाले? यापूर्वी काय काय घटना घडल्या? हे प्रामुख्याने क्षेत्र ज्या व्यक्तीचे विकत घ्यावयाचे आहे, त्याच्या फेरफारपासून तपासणी सुरू करावी. फेरफारमध्ये आपल्याला मालकी हक्क कर्ज प्रकरण प्रलंबित सोसायटी कर्ज, बँकाचे कर्ज तसेच एखाद्या व्यवहाराचा प्रलंबित फेरफार देखील व्यवहार स्पष्ट करत असतो, त्यामुळे फेरफार पाहणे खूप गरजेचे आहे.
- अॅडव्होकेट मयूर कारभारी वाखुरे, जिल्हा व सत्र न्यायालय, नेवासा, अहिल्यानगर