गोंदिया-भंडारा जिल्हा घनदाट वनांनी व्यापलेला आहे. या जिल्ह्यांना नवेगावबांध- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सीमा लागून आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून शेती पिकाचे नुकसान होण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत आहे. याला आळा घालण्यासाठी जंगलालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना वन विभागातर्फे झटका मशीन देण्यात येणार आहे. यामुळे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे.
वन्यप्राण्यांपासून शेत पिकाचे नुकसान टाळता यावे, याकरिता महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने जारी केलेल्या २५ मे २०२२ व १६ सप्टेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, जन वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून, सौर ऊर्जा कुंपणाची बाब (झटका मशीन) समाविष्ट करण्याचा शासन निर्णय घेतला आहे. बफर क्षेत्रातील संवेदनशील गावांमध्ये वैयक्तिक सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ देण्यात येत आहे. सोलर कुंपण संचामध्ये दहा वर्षांच्या वॉरंटीसह ४० वॅटचे सोलर पॅनल, १४ महिन्याच्या वारंटीसह, १२ होल्टची बॅटरी, १२ गेजचे ४० किलोग्रॅमचे वायर, चार किलोग्रॅमचे वाइंडिंग तार, ५०० नग इन्सुलेटर या संपूर्ण साहित्याचा या संचामध्ये समावेश आहे.
डीबीटीद्वारा मिळणार लाभ
ही योजना प्रति लाभार्थी सौर ऊर्जा कुंपणाच्या एकूण १६ हजार रुपये किमत रकमेच्या ७५ टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ कृषी विभागाच्या धरतीवर थेट, लाभ हस्तांतरणमार्फत अनुदान परस्पर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित समिती अध्यक्ष, सचिव किवा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करून, तसेच महाडीबीटी https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, त्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल.
योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घ्यावा
नवेगाव-नागझिरा अभयारण्य प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात असलेल्या सर्व गावांतील लाभार्थ्यांनी त्याचे ग्राम परिस्थितीची विकास समिती तसेच संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त संख्येने या योजनेत सहभाग नोंदवून योजनेचा लाभ घेऊन, मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सडक अर्जुनीचे वनप- रिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे यांनी केले आहे.
झटका मशीन शेतकऱ्यांना फायदेशीर
शेतकरी गंगाधर परशुरामकर म्हणाले की, नवेगाव-नागझिरा अभयारण्य लागून असलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे फार मोठे नुकसान होत होते; पण, आता झटका मशीन जंगलाच्या बाजूला लावल्याने शेतीचे आर्थिक नुकसान होणार नाही. झटका मशीन लावल्याने वन्यप्राणी शेतीत येणार नाहीत. अशोक कोल्हे म्हणाले की, झटका मशीन ही आता शेतकऱ्यांना वरदानच ठरणार आहे. आमची शेती नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने, दरवर्षी शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. आता झटका मशीन लावल्याने शेतपिकांचे नुकसान होणार नाही.