Kanda Sathvanuk : राज्यात कांदा पिकाचे उत्पादन (Kanda Production) मोठ्या प्रमाणात होत असून शेतकरी सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवुन ठेवून किंवा स्थानिकरित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक (Kanda Sathavnuk) करतात. त्यामुळे कांदा सडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो. शास्त्रशुध्द कांदाचाळ (Kanda Chal) उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असल्याने कांदाचाळ उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
कांदा चाळीची उभारणी करताना घ्यावयाची काळजी
- जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यक तेवढा पाया खोदुन आराखडानुसार सिमेंट काँक्रेटचे कॉलम उभारणे आवश्यक आहे.
- या कॉलमवरती लोखंडी अँगल किंवा लाकडी खांबाद्वारे चाळीचा संपुर्ण सांगाडा तयार करावा.
- एक पाखी कांदा चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर तर दुपाखी कांदाचाळी उभारणी पुर्व-पश्चिम करावी.
- चाळीच्या आतील उष्णता व आर्द्रतेचे प्रमाण कमी राहील अशी व्यवस्था करावी, त्यामुळे कांदा लवकर सडत नाही.
- भरपूर सुर्यप्रकाश व खेळती हवा असलेली उंच ठिकाणावर असेलली जागा कांदाचाळ उभारणीसाठी निवडावी.
- कांदा चाळीची साठवणूकीची जागा जमिनीपासून किमान ६० से.मी. उंच असावी.
- २५ मे.टन कांदाचाळी साठी लांबी ४० फुट प्रत्येक कप्प्याची दुपाखी चाळीसाठी रुंद ४ फुट, बाजुची उंच 8 फुट मधली उंची ११. १ फुट दोन ओळीतील मोकळ्या जागेची रुंदी ५ फुट, कांदाचाळीची एकुण रुंदी ३.९ मी अशा रितीने कांदा चाळीचे बांधकाम करताना आकारमान घ्यावीत.
- चाळीची आतील कप्प्याची रुंदी ही ४ फुट पेक्षा जास्त नसावी.
- ५० मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी लांबीचे प्रमाण दुप्पट करावे व रुंदी/उंचीचे प्रमाण हे २५ मे.टन क्षमतेप्रमाणे कायम राहील हे पाहणे महत्वाचे आहे.
- कांद्याची साठवणूक फक्त ५ फुटांपर्यंत करावी.
- सदर मोकळ्या जागेमध्ये जाड वाळू (भरडा) टाकलेली असावी.
- तथापि, स्थानिक परिस्थितीनुसार जमिनीपासून ठेवावयाच्या उंचीमध्ये बदल करण्यास हरकत नाही.
- कांदा चाळीची लांबीची दिशा दक्षिण उत्तर असावी, जेणेकरुन कांदा चाळीमध्ये जास्तीत जास्त हवा खेळती रहाण्यास मदत होईल. तथापि, जास्त पर्जन्यमान असणाऱ्या ठिकाणी कांदा चाळीच्या लांबीची दिशा पुर्व पश्चिम ठेवण्यात यावी.
- कांदा चाळीसाठी तळाशी किंवा बाजूच्या भिंतीना क्राँक्रीट वापरण्यात येऊ नये, त्याऐवजी जीआय लिंक जाळी किंवा लाकडी बॅटम पट्टयांचा किंवा बांबूचा वापर करावा.
- कांदा चाळीवर टाकण्यात आलेले छताचे पत्रे चाळीच्या बांधकामापेक्षा १ मीटर लांब असावेत व छताचा कोन २२ अंश इतका असावा.
- पावसाळयामध्ये कांदा चाळीच्या दोन्ही बाजूस बारदान लावावे, जेणेकरुन कांदा चाळींमधील कांदा जास्तीत जास्त दिवस सुस्थितीत राहील.
- पवन मधुकर चौधरी, विषय विशेषज्ञ- उद्यानविद्या, कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव, नाशिक
Kanda Kadhani : कांदा काढणी करताना आणि सुकवताना काय काळजी घ्यावी? वाचा सविस्तर