Kanda Sathvanuk : कांदा लागवड (Kanda Lagvad) भारतात फार पूर्वीपासून प्रमुख भाजीपाला आणि मसाला पिक म्हणून करण्यात येत असून कांद्याचे उत्पादन आणि गरज सातत्याने वाढत आहे. कांद्याची वाढती गरज भागविण्यासाठी लागवडीखालील क्षेत्र वाढवून उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर कांद्याची दीर्घ काळासाठी अधिक उपलब्धता होण्यासाठी काढणीनंतरचे नुकसान कमी करून साठवण क्षमता वाढवणे गरजेचे आहे. कांद्याची दीर्घकाळ साठवणूक (Onion Storage) हि अनेक घटकांचा एकत्रित परिणाम आहे आणि हा परिणाम चांगल्या प्रकारे साधायचा असेल, तर सर्व घटकांचा एकत्रितपणे विचार करून नियोजन करणे योग्य ठरेल.
जातींची निवड -
- सर्वच स्थानिक वाणांची साठवण क्षमता सारखी नसते. भीमा शक्ती, भीमा किरण, एन. २-४-१, अॅग्री
- फाउंड लाईट रेड इ. सारख्या शिफारस केलेल्या वाणांची लागवड करावी.
- या जाती ३ ते ६ महिने साठवणीत विशेष घट न होता चांगल्या टिकू शकतात.
खते व पाणी नियोजन -
- कांदा पिकाला हेक्टरी १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ८० किलो पालाश आणि ५० किलो गंधकाची शिफारस केली आहे.
- रासायनिक खतांचा पुरवठा ६० दिवसांच्या आतच करावा.
- कांदा पिकाला पाणी कमी परंतु नियमित लागते.
- कांदे पोसत असतांना एकाचवेळी भरपूर पाणी दिल्यास माना जाड होतात.
- कांदा काढणीच्या २ ते ३ आठवडे अगोदर पाणी बंद करावे.
कांदा सुकविणे -कांदा काढल्यानंतर शेतात ३ ते ४ दिवस अश्या पद्धतीने सुकवावा की दुसऱ्या ओळीने पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकावा. या पद्धतीने ३-४ दिवस साठवणूक केलेल्या कांद्याची पूर्ण सुकलेली पात ३ ते ४ सें.मी. लांब नाळ ठेवून कापावी.
साठवणीत येणारे रोग -
- शेतात व्यवस्थित न सुकवलेले कांदे साठवणुकीत लवकर सडतात.
- कांद्यांची सड हि बुरशी आणि कृमिंमुळे होते.
- तसेच अधिकचे तापमान आणि ८० टक्यांपेक्षा जास्त आर्द्रता यामुळेही कांद्यांची मोठ्या प्रमाणात सड होते.
- कृमिमुळे होणारी सड (Bacterial rot), काळी बुरशी किंवा काजळी (Black mould), निळी कुज (Blue mould rot), खोड कुज (Fusarium basal rot)
साठवणगृहातील वातावरण - चांगल्या साठवणुकीसाठी साठवण गृहातील आर्द्रता ६५ ते ७० टक्के तर तापमान २५ ते ३० डिग्री. सेंटीग्रेडच्या दरम्यान असावे.
साठवण गृहाची रचना -
- एक पाखी चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर असावी तर दोन पाखी चाळीची उभारणी पूर्व-पश्चिम करावी.
- साठवण गृहाची लांबी ५० फुटांपेक्षा आणि पाखीची रुंदी ४.५ फुटांपेक्षा जास्त असू नये.
- तळाशी हवा खेळती राहण्यासाठी २ फुटाची मोकळी जागा असावी.
- चालीचे छप्पर ऊसाचे पाचट किंवा सिमेंटच्या पत्र्याने झाकावे.
- छप्पर उतरते असावे आणि उभ्या भिंतीच्या ३ फुट पुढे असावे.
कांद्याचे आकारमान -
- काढणी करत असताना जखमा झालेले कांदे साठवणुकीत लवकर खराब होतात तसेच सभोवतालचे इतर कांदे देखील याला बळी पडतात.
- कांद्याच्या आकारमानाचा परिणाम साठवणुकीवर होत असल्याने ५५ ते ७५ मि.मी. जाडीचे कांदे साठवणूकित ठेवावेत.
- लहान गोलटी कांदा साठवणुकीत लवकर सडतो.
साठवलेल्या कांद्याच्या थराची उंची व रुंदी -
- चाळीतील कांद्याच्या थराची उंची ४ ते ५ फुटांपेक्षा जास्त असू नये.
- उंची वाढल्याने तळाच्या कांद्यांवर बहार वाढून तळाचा कांदा लवकर खराब होतो.
- वायुवीजन व्यवस्थित होण्यासाठी पाखीची रुंदी ४.५ फुटांपेक्षा जास्त नसावी.
- पवन मधुकर चौधरी, विषय विशेषज्ञ- उद्यानविद्या, कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव, नाशिक स्त्रोत - भा.कृ.अ.प.- कांदा आणि लसूण संशोधन संचलनालय, राजगुरुनगर, पुणे