Join us

Kapus Vechni : कापसाची पहिली वेचणी 30 ते 35 टक्के बोंडे फुटल्यावर करावी, कारण... वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 3:58 PM

Kapus Vechni : कापसाची वेचणी आणि साठवणूक या दोन गोष्टी महत्वपूर्ण ठरतात. या लेखातून समजून घेऊया.... 

Kapus Vechni : राज्यात कापसाची वेचणी सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान करण्यात येते. कापसाला मिळणारी किंमत ही स्वच्छता, शुद्धता धाग्याची लांबी, मुलायमता या बाबींवर ठरते. स्वच्छ पांढराशुभ्र मध्यम ते लांब धाग्याच्या कापसाला चांगला भाव मिळतो. त्यामुळे कापसाची वेचणी आणि साठवणूक या दोन गोष्टी महत्वपूर्ण ठरतात. या लेखातून समजून घेऊया.... 

कापसाची वेचणी

  • कापसाची पहिली वेचणी ३० ते ३५ टक्के बोंडे फुटल्यावर करावी. 
  • १५ ते २० दिवसाच्या अंतराने पुढील वेचण्या कराव्यात. 
  • वेचणीस उशीर झाल्यास कापूस जमिनीवर गळून पडतो, त्यास माती काडीकचरा वाळलेली पाने चिकटतात, त्यादरम्यान पाऊस पडल्यास कापूस ओला होवून पिवळसर पडतो.                 
  • कापसाची वेचणी सकाळी ओल्या हवेत केल्याने काडीकचरा व वाळलेली पाने कापसाला चिकटत नाहीत. 
  • संपूर्ण फुटलेल्या बोंडातून कापूस वेचावा, अर्धवट उमललेल्या बोंडातील कापूस वेचू नये. 
  • कापूस वेचताना किडका, पिवळसर तसेच कवडीचा कापूस वेगळा वेचावा व त्याची साठवणूक ही वेगळी करावी. 
  • कापसाची वेचणी करताना कापसाचे धागे तुटू देऊ नयेत. वेचलेल्या कापसात काडीकचरा येऊ देऊ नये. 
  • वेचलेला कापूस ताडपत्री अथवा कापडावर पसरून ठेवावा म्हणजे, त्यात माती काडीकचरा मिसळणार नाही.    

 

कापसाची साठवणूक कशी करावी?            

  • कापसाची साठवणूक कोरड्या व थंड जागेत करावी. 
  • पावसाळी अगर दमट वातावरणात वेचणी केलेला कापूस पिंजण्यापूर्वी चांगला वाळवावा. 
  • वेचलेला कापूस योग्य प्रकारे ऊन देऊन त्यामध्ये कुठलीही कीड नाही याची खात्री करून साठवावा. 
  • कापूस साठवण्यापूर्वी उन्हात वाळवल्याने कापसावरील सेंद्रिय अळीपासून होणारे नुकसान टाळता येते. 
  • साठवणीमध्ये कापूस अधून मधून हलवून त्यात उष्णता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.  
  • उष्णता निर्माण झाल्यास कपाशीचा दर्जा कमी होऊन बाजार भावही कमी मिळतो.

 

संकलन : डॉ. कल्याण देवळाणकर, सेवानिवृत्त शास्रज्ञ कृषी विभाग 

टॅग्स :कापूसनागपूरविदर्भजळगावशेती क्षेत्र