Join us

Kharif Crops :सोयाबीन, ज्वारी, मका, भात या खरीप पिकांची काढणी कधी करावी? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 3:50 PM

Kharif Crops : मूग, उडीद, सोयाबीन, खरीप ज्वारी, मका, भात, सूर्यफूल आदी खरीप पिकांची काढणी कधी  करावी, हे या लेखातून समजून घेऊया.

Kharif Crops :खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची वेळेवर काढणी न केल्यास ती प्रमाणापेक्षा जास्त पक्व होऊन/जमिनीवर गळ होऊन पिकाचे नुकसान होते. त्यासाठी विशिष्ट लक्षणांवरून पिकांची योग्य वेळी काढणी करणे हितकारक ठरते. यात मूग, उडीद, सोयाबीन, खरीप ज्वारी, मका, भात, सूर्यफूल आदी खरीप पिकांची काढणी कधी  करावी, हे या लेखातून समजून घेऊया.            मूग व उडीदमुग व उडदाच्या शेंगा ७५ टक्के वाळल्यानंतर पहिली तोडणी व त्यानंतर ८ ते १० दिवसांच्या अंतराने नंतरच्या तोडण्या कराव्यात. शेंगा खळ्यावर चांगल्या वाळल्यावर काठीने झोडपून दाणे अलग करावेत.       सोयाबीन       सोयाबीनच्या शेंगाचा रंग पिवळट तांबूस झाल्यानंतर जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार ९० ते ११० दिवसात काढणी करावी. सोयाबीनच्या काढणीस उशीर झाल्यास शेंगा फुटण्यास सुरुवात होते.          भुईमूगभुईमुगाचे पीक काढणीसाठी तयार झाले की, त्याची पाने पिवळी पडू लागतात, शेंगाचे टरफल टणक बनते, टरफलाची आतील बाजू काळी दिसते, अशा प्रकारची लक्षणे दिसताच भुईमुगाची काढणी करावी.        खरीप ज्वारीखरीप ज्वारीच्या कणसाचा दांडा पिवळा झाल्यावर तसेच कणसाच्या खालच्या भागातील दाणे टणक झाल्यावर आणि दाण्याचा खालचा भाग काळा झाल्यानंतर (१७ ते १८ टक्के ओलावा असताना) कापणी करावी.                  भातभाताच्या लोंब्यांमधील ८० ते ९० टक्के दाणे पक्व झाल्यानंतर भाताची कापणी करावी. कापलेला भात वाळण्यासाठी १ ते २ दिवस पसरुन ठेवावा व नंतर मळणी करावी.                   मकामक्याच्या कणसावरील आवरण पिवळसर पांढरे झाल्यावर कणसे सोलून खुडून घ्यावीत.  कणसे उन्हात २ ते ३ दिवस चांगले वाळवावीत.

सूर्यफुल व तीळसूर्यफुलाची पाने, देठ व फुलाची मागील बाजू पिवळी झाल्यावर काढणी करावी. साधारणपणे ७५ टक्के पानाचा व खोडाचा रंग पिवळसर दिसायला लागल्यावर तिळाचे पीक काढणीस योग्य झाले आहे असे समजावे. लवकर काढणी केल्यास तीळ बारीक व पोकळ राहतात. तर काढणीस उशीर केल्यास तीळ शेतात गळून पडतात.

बाजरी बाजरीचे कणीस हातात दाबले असता त्यातून दाणे सुटणे, तसेच दाताखाली दाणा चावल्यानंतर कट्ट असा आवाज आल्यास बाजरीचे पीत कापणीस योग्य झाले आहे असे समजावे. ताटाची कणसे विळयाने कापून ती गोळा करुन, वाळवून नंतर मळणी करावी.

- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीखरीपपीक व्यवस्थापन