Kharip Kanda Kadhani : महाराष्ट्रात रब्बी, खरीप आणि उशिरा खरीप या तीन हंगामात कांद्याचे (kharif Onion) उत्पादन घेतले जाते. सुमारे ६० टक्के उत्पादन रब्बी पिकातून येते. तर खरीप आणि उशीरा खरीप पिकांचा वाटा प्रत्येकी २० टक्के असतो. रब्बी हंगामातील कांद्याचे पीक एप्रिल-मेमध्ये काढले जाते, तर खरीप कांद्याचे पीक ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये बाजारात उपलब्ध होते. सध्या खरीपातील कांदाकाढणी सुरू असून काढणी दरम्यान काय काळजी घ्यावी? पाहुयात सविस्तर
खरीप कांदा काढणी
खरिपाच्या कांदा पिकाची काढणी वेगवेगळ्या जातीनुसार पुनर्लागवडीनंतर १०० ते ११० दिवसांनी करावी. खरिपात कांदा तयार झाला तरी माना पडतीलच असे नाही. अशावेळी पीक काढणीच्या दोन किंवा तीन दिवस आधी रिकामा बॅरल फिरवून कृत्रिमरीत्या माना पाडाव्या लागतात. शेत कोरडे असताना पीक काढणी करावी. कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह तीन-चार दिवस सुकण्यास पडू द्यावा.
प्रत्येक वाफ्यातील कांदा अशारीतीने ठेवावा की, दुसरी ओळ पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकेल आणि पात उघडी राहील. तीन-चार दिवसात कांद्याची पात पूर्णपणे सुकते. कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते २५ सें.मी. लांब मान ठेऊन कापावी नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले कांदे आणि चिंगळी कांदे काढून टाकावे. राहिलेले चांगले कांदे गोळा करून सावलीत १०-१२ दिवस ठेवावे.
- ग्रामीण मौसम कृषी सेवा, विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी