Maka Lagvad : मका पेरणीसाठी खरीप आणि रब्बी हंगामात (Maize Crop Management) अनुकूल असते. खरीप हंगामात पेरणी जून-जुलै महिन्यात केली जाते, तर रब्बी हंगामात पेरणी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते. हेच रब्बी हंगामातीलमका लागवडीचे तंत्र (Maka Lagvad Tantra) या लेखातून समजून घेऊया....
मका लागवड
मका लागवडीची योग्य वेळ म्हणजे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर ही होय. मात्र एक/दोन आठवडे पेरणीस उशिर झाला तरी उत्पादनात फारसा फरक पडत नाही. मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निच-याची व ६.५ ते ७.५ दरम्यान सामू असलेली जमीन योग्य असते.
मका वाण
संगम, कुबेर, राजर्षी, फुले महर्षी, महाराजा, बायो-९६८१/९६३७, एचक्युपीएम-१/२१/२७, विवेक हे संकरित व आफ्रिकन टॅाल या संमिश्र मका वाणांची लागवडीसाठी शिफारस केलेली आहे.
बियाणे
धान्यासाठीच्या मका पेरणीकरिता हेक्टरी १५ ते २० किलो व चा-यासाठीच्या मका पेरणीसाठी हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास २ ते २.५ ग्रॅम थायरम या बुरशीनाशकाची व २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर या जिवाणूसंवर्धनाची बीज प्रक्रिया करावी.
उशिरा किंवा मध्यम कालावधीत तयार होणा-या धान्यासाठीचे वाण लागवड करताना पेरणीचे अंतर ७५ x २० सें.मी. तर लवकर तयार होणारे धान्यासाठीचे वाण पेरणी करताना पेरणीचे अंतर ६० X २० सें.मी. ठेवावे.
खतमात्रा
पेरणीच्यावेळी प्रति हेक्टर क्षेत्रास ८८ कि. युरिया, ३७८ कि. सिंगल सुपर फॅास्फेट व ६८ कि. म्यूरीयट ॲाफ पोटॅश ही खते दयावीत. पेरणीनंतर ३० व ४५ दिवसांनी प्रत्येकी ८८ कि. युरिया प्रति हेक्टरी दयावा.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ