राज्यातील अनेक भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांची दाणादाण उडवली. अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत रब्बीचा हंगाम असल्याने अनेक रब्बी पिकांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यात रब्बीतील महत्वाचे पीक असलेल्या गहू पिकावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत असून मध्यतंरी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुरवातीला दोन दिवस ढगाळ हवामानासह वातावरण बदलाचा परिणाम जाणवला. त्यानंतर दोन दिवसांनी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचे आगमन झाले. नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष पंढरीचे मोठे नुकसान झाले. त्यातच रब्बीची पेरणी देखील काही भागात झाल्याने या पावसामुळे तिथंही नुकसान सोसावे लागले. अशातच रब्बीतील प्रमुख पिके असलेल्या गहू, हरभरा पिकांना देखील अवकाळीचा फटका बसला. या पार्श्वभूमीवर डॉ. योगेश पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर सूचना केलेल्या आहेत.
डॉ. योगेश पाटील सांगतात की, अवकाळी पावसानंतर लागवड केलेल्या गहू पिकाचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. अनेक भागात नुकतीच गहू पिकाची लागवड करण्यात आली. काही ठिकाणी पिके ऐन भरात आली आहेत. मात्र अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची झोपच उडवली. त्यामुळे अनेक शेतात पाणी साचून पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. अशावेळी प्रथमतः पिकातून पाणी काढून द्यावे, त्यानंतर पिकाचा वापसा बघून त्या पुढील उपाययोजना करणे आवश्यक आहेत. जर गव्हाचं पीक पिवळं पडत असेल तर एक आठवडाभरात 19:19:19 या विद्राव्य खताची फवारणी करावी. एक लिटर पाण्यात 7 ग्रम खताची मात्रा घेऊन गहू पिकावर फवारणी करण्याची सूचना पाटील यांनी दिली.