वर्धा : शेतीमध्ये तणांच्या अमर्यादित वाढीमुळे पिकांची पेरणी (Crop Sowing) व आंतरमशागत अशा कामांत समस्या निर्माण होतात. विविध तणांमुळे कापूस पिकात (cotton Crop) ८० टक्क्यांपर्यंत घट येत असल्याचे दिसून आले आहे. कपाशीची लागवड 'न्यूमॅटिक प्लांटर'च्या साहाय्याने केल्यास तणांचा प्रादुर्भाव कमी होतो व पीक जोमाने वाढते. यासाठी शेतकऱ्यांनी न्यूमॅटिक प्लांटरने (Pneumatic planter) कापूस पिकाची लागवड करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कातोरे यांनी केले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (Akola) संलग्नित कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या वतीने जिल्ह्यात २०० हेक्टरवर सघन कपाशी लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी, सेलू आष्टी, कारंजा, हिंगणघाट, समुद्रपूर व देवळी या तालुक्यांमधील लाभार्थी शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड (cotton Cultivation) ९० ३० व १० १५ या अंतरावर केली आहे. दोन झाडांतील अंतर तसेच ओळींतील अंतर हे दिलेल्या तंत्रज्ञानानुसार करता यावे, यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्याद्वारे ट्रॅक्टरचलित 'न्यूमॅटिक प्लांटर' उपलब्धीमुळे सुकर झाले आहे. याचा फायदा प्रकल्पातील लाभार्थी शेतकऱ्यांना होत असून याद्वारे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली आहे.
हे आहेत फायदे
'न्यूमॅटिक प्लांटर' हे यंत्र कपाशीच्या दिलेल्या अंतरानुसार कमी जास्त करता येते; तसेच दिलेले अंतर तंतोतंत राखण्यात मदत होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो व पीक जोमाने वाढते. सद्यः स्थितीत शेतकऱ्यांना भेडसावणारी मजूर समस्या आणि वेळेचा कमी उपयोग पाहता 'न्यूमॅटिक प्लांटर'ने कापूस पिकाची लागवड करणे अधिक योग्य आहे, असेही कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. कातोरे यांनी सांगितले.
खरांगण्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शनखरांगणा येथील शेतकरी जगन खडकाळे यांच्या शेतावर कपाशीची अतिघन लागवड अंतर्गत ट्रॅक्टरचलित न्यूमॅटिक प्लांटर पेरणी यंत्राच्या साहाय्याने कपाशीची लागवड करण्यात आली. यावेळी कपाशी पिकासाठी 'न्यूमॅटिक प्लांटर' कशा पद्धतीने काम करते; तसेच त्यामधील योग्य अंतर कशा प्रकारे नियंत्रित राहते याविषयी प्रबोध पाटे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सघन लागवड प्रणाली शेती न्यूमॅटिक प्लांटर'ची पेरणी ही ९०×१५ सें.मी.मध्ये २९ हजार ६२९ प्रतिएकर झाडांची संख्या व कमी अंतराची लागवड पद्धत ९० × ३० सें.मी. १४ हजार ८१४ प्रतिएकर झाडांची संख्या राखण्यात मदत होते, याविषयी सुमित म्हसाळ यांनी माहिती दिली.