भारत सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये खाद्यतेलांसाठी राष्ट्रीय मिशन - ऑइल पाम (NMEO-OP) सुरू केले. 2025-26 पर्यंत तेल पामची लागवड वाढवण्यासाठी आणि कच्च्या पाम तेलाचे उत्पादन 11.20 लाख टनांपर्यंत वाढवण्यासाठी हे अभियान कटिबद्ध असून ही योजना देशभरातील 15 राज्यांमध्ये कार्यरत केली जाणार आहे. यातून जवळपास 21.75 लाख हेक्टर जमीन या लागवडीखाली येण्याची शक्यता आहे. या मिशन अंतर्गत आतापर्यंत 1 कोटी लागवड साहित्याची क्षमता असलेल्या 111 रोपवाटिका स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच 1.2 कोटी लागवड साहित्याची क्षमता असलेल्या 12 बियाण्यांच्या उद्यानांचीही स्थापना करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून खाद्यतेलाचा तुटवडा होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर देशातच खाद्यतेलाचे अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशन सुरु करण्यात आले आहे. या द्वारे नवीन भौगोलिक भागात तेल पामला चालना देण्यासाठी, शेतकऱ्यांना लागवड साहित्याच्या समर्थनासाठी शेवटपर्यंत मदत पुरवण्यासाठी आणि खाजगी उद्योजकांकडून खरेदी सुनिश्चित करण्यासाठी अनिवार्य आहे. तेलाच्या जागतिक किमतीतील अस्थिरता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व्हायबिलिटी गॅप पेमेंट प्रदान करण्यात आले आहे. सरकारने पाम तेलाची विक्री किंमत ऑक्टोबर 2022 मध्ये 10 हजार 516 रुपयांवरून नोव्हेंबर 2023 मध्ये 13 हजार 652 रुपये केल्याचे सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांना प्रोत्साहन
तसेच व्हायबिलिटी गॅप पेमेंट लाभाव्यतिरिक्त, सरकारने नॅशनल मिशन ऑन ऑइल पाम अंतर्गत लागवड साहित्य आणि व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 70 हजार रुपये विशेष सहाय्य दिले आहे. पाम तेल लागवडीसाठी कापणी उपकरणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना 2 लाख 90 हजार रुपयांची मदत दिली जात आहे. याशिवाय कस्टम हायरिंग सेंटर (CHC) स्थापन करण्यासाठी 25 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
पाम शेतकऱ्यांसाठी वन-स्टॉप केंद्रे
दरम्यान या मिशन अंतर्गत, प्रक्रिया कंपन्या ऑइल पाम शेतकऱ्यांसाठी वन-स्टॉप केंद्रे देखील स्थापन करत आहेत. जिथे ते इनपुट, कस्टम भाड्याने सेवा, चांगल्या कृषी पद्धतींबद्दल कृषी सल्ला आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनांचे संकलन करणार आहेत. हा दूरदर्शी उपक्रम आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि भारतातील खाद्यतेलाच्या उत्पादनासाठी शाश्वत आणि स्वयंपूर्ण परिसंस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.